Thursday, 14 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४  फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित

Ø अनियंत्रित ठेवी योजना प्रतिबंधक विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर

Ø राज्य शासनाचे ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर; मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी उदय देशपांडे जीवनगौरव पुरस्कार

आणि

Ø सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं काल राज्यात विविध ठिकाणी आंदोलन

****



 संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहुतांश पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या निरोपाच्या भाषणात, गेली सुमारे पाच वर्ष सदनाचं कामकाज उत्तमप्रकारे चालवल्याबद्दल लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आभार मानले. सदनाचं कामकाज चालवण्यात सर्व सदस्यांचं योगदान असल्याचं, महाजन यांनी सांगितलं.



 सोळाव्या लोकसभेनं घेतलेल्या, वस्तू आणि सेवा कर, खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना आरक्षण, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, यासह इतर अनेक निर्णयांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. कालबाह्य झालेले सुमारे चौदाशे कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनाचं कौतुक केलं.



 राज्यसभेत मात्र, या सत्रात केवळ चार पूर्णांक नऊ टक्के कामकाज झाल्याबद्दल सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी खंत व्यक्त केली. अधिवेशन काळात फक्त सहा विधेयकं सादर झाली, तर तीन विधेयकं मंजूर होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं. जनहिताचे अनेक मुद्दे चर्चेला घेता न आल्यानं राज्यसभेचं हे सत्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं नमूद करत, सदस्यांनी आत्मचिंतन करायला हवं, असं मत नायडू यांनी व्यक्त केलं.



 रम्यान, राज्यसभेत काल अखेरच्या दिवशी, अंतरिम अर्थसंकल्प, लेखानुदान विनियोग विधेयक, वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक आणि वित्त विधेयकाला विनाचर्चा संमती देण्यात आली.



 लोकसभेत काल अनियंत्रित ठेवी योजना प्रतिबंधक विधेयक २०१८ मंजूर करण्यात आलं. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विविध योजनांमध्ये छोट्या रकमा गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण मिळेल, असं अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. बेकायदेशीररीत्या पैसा जमा करण्याऱ्या योजनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे.



 लोकसभेनं काल जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक सुधारणा विधेयक २०१८ लाही मंजुरी दिली. स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सरकारनं सांगितलं. मात्र, काँग्रेस सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत, मतदानावेळी सभात्याग केला.

****



 भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक - कॅगचा अहवाल काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या राफेल व्यवहारातली किंमत याआधीच्या सरकारच्या कार्यकाळातील किंमतीपेक्षा दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे.

****



 पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सगळे, म्हणजे तीनही हप्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी मंत्रालयातल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****



 कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याची पुणे पोलिसांची मागणी फेटाळण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. मात्र, याप्रकरणात आरोपी असलेले पाच मानवाधिकार कार्यकर्ते आता नियमित जामीनासाठी अर्ज करू शकतील, असंही सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं.

****



 अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे ध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा - सीबीआयनं संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात काल विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल आणि मोटारसायकल यांचा शोध अद्याप सुरू असल्याचं, सीबीआयकडून सांगण्यात आलं.

****



 अटल महापणन विकास अभियाना अंतर्गत शहरी भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला असून शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगटांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा शेतीमाल, अन्न धान्य, फळे, भाजीपाला, प्रक्रिया झालेली उत्पादनं उपलब्ध व्हावीत, यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

****



 इमारत दुर्घटनेमध्ये वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंता यांच्याबरोबरच बांधकाम निरीक्षक आणि समन्वयक यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यासंदर्भात धोरण आखावं, अशा सूचना नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या आहेत. या विषयावर काल मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. मुंबई वगळता, राज्यात इतर ठिकाणी बांधकामासंदर्भात नव्याने तयार करण्यात येत असलेल्या, बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत, या धोरणाचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राज्य शासनाच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी उदय देशपांडे यांना २०१७-१८ यावर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते, यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पंधरा जणांना जाहीर झाले असून, विविध क्रीडा पुरस्कारांसाठी सहा दिव्यांग खेळाडूंसह सदतीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. येत्या सतरा तारखेला मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये दिली.

****



 औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं ॲमेझिंग औरंगाबाद या प्रकल्पांतर्गत राष्ट्रगीताची एक विशेष ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. औरंगाबाद परिसरातल्या वारसा स्थळांचं दर्शन घडवणारी या ध्वनिचित्रफितीचं आज लोकार्पण होत आहे. शहरातल्या महात्मा गांधी संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****



 सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसनं काल राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. लातूरमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणीमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर यासाठी मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आलं.



 स्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी भजे तळून सरकारचा निषेध केला.



 धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

****



 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेली मानधनवाढ देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आयटक प्रणीत राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं, काल औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केलं. या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं, गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, लासूर, सावखेडा इथंही आंदोलन करण्यात आलं.

****



 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांच्याविरुद्ध नगरपालिकेच्या ३७ पैकी २६ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अविश्वास प्रस्ताव तत्काळ दाखल करून त्यावर चर्चा किंवा मतदान घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली आहे. नगरपालिकेच्या गैरकामाबाबत नगरसेवकांनी  सर्वसाधारण सभेत केलेल्या तक्रारीची दखल मुख्यधिकारी कामटे यांनी न घेतल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे.

****



 औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष बॅरिस्टर जवाहर गांधी यांचं काल पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. गांधी यांनी, मराठवाडा शेती सहाय्य मंडळामार्फत मराठवाड्यात 'पाणी अडवा-पाणी जिरवा आणि जमीन भिजवा' हे अभियान राबवलं होतं.

****



 ातूरच्या अन्न आणि औषध प्रशासनानं तीन लाख रूपयांचा पानमसाला जप्त केला आहे. लातूर इथं स्कॉर्पिओ गाडीत हा साठा आढळून आला.



 लातूर - नांदेड रस्त्यावर घरणी इथं एका पोलीस कर्मचाऱ्याचा भरधाव वाहनानं दिलेल्या धडकेत  काल मृत्यू झाला. नागेश चौधरी असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून, ते या रस्त्यावर वाहनांची तपासणी करत होते. सदरील वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****



 अहमदनगर इथं काल कर्जमुक्ती परिषद घेण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आयोजित या परिषदेला संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सरकारने या पॉलीहाऊस, शेडनेटधारक शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत, या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी या परिषदेतून करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...