Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पाला तसंच
लेखानुदान विनियोग विधेयक, विनियोग विधेयक, वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक आणि वित्त
विधेयकाला विनाचर्चा संमती देण्यात आली आणि ही विधेयकं पुन्हा लोकसभेत पाठवण्यात आली.
विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेच्या कामात दोनदा अडथळे आले. या
सत्रात केवळ चार पूर्णांक नऊ टक्के कामकाज झाल्याचं सांगतानाच, फक्त तीन विधेयकं मंजूर
आणि सहा विधेयकं सादर झाल्याचं सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. जनहिताचे
अनेक मुद्दे चर्चेला घेता न आल्यानं राज्यसभा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी
ठरल्याचं नमूद करत, याबाबतीत सदस्यांनी आत्मचिंतन करायला हवं, असं मत नायडू यांनी व्यक्त
केलं.
लोकसभेत
आज अनियंत्रित ठेवी योजना प्रतिबंधक विधेयक २०१८ मंजूर करण्यात आलं. असंघटित क्षेत्रात
काम करणाऱ्या आणि विविध योजनांमध्ये छोट्या रकमा गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण
मिळेल, असं वित्त मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. बेकायदेशीररीत्या पैसा जमा करण्याऱ्या
योजनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात असल्याचं नमूद करत, यामुळे गुंतवणूकदारांच्या
हिताचं रक्षण होईल, असं गोयल यांनी सांगितलं.
लोकसभेनं
आज जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक सुधारणा विधेयक २०१८ लाही मंजुरी दिली. स्वातंत्र्यलढ्यात
राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठी हे विधेयक आणल्याचं
सरकारनं सांगितलं. मात्र, काँग्रेस सदस्यांनी याच्या विरोधात काही काळ सभात्याग केला.
भारतीय
वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक - कॅगचा अहवाल आज संसदेच्या
दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या
राफेल व्यवहारातली किंमत याआधीच्या सरकारच्या कार्यकाळातील किंमतीपेक्षा दोन पूर्णांक
शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. या पूर्वीच्या सरकारनं
केलेल्या एकशे सव्वीस विमानांच्या खरेदी कराराच्या तुलनेत या सरकारनं केलेल्या छत्तीस
विमानांच्या खरेदी करारात पैशांची बचत झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे.
दरम्यान,
बहुमताचं सरकार असल्यामुळेच भारतानं जगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवलं आहे, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात नमूद केलं.
संसदेचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आज दोन्ही सभागृहं संस्थगित झाली.
****
पंतप्रधान
शेतकरी सन्मान योजनेचे सगळे, म्हणजे तीनही हप्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी पात्र शेतकरी
लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी मंत्रालयातल्या सूत्रांनी
ही माहिती दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
****
राज्य
शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’ची आज घोषणा
करण्यात आली. येत्या सतरा तारखेला मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते
या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी
आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी योगदान
देणाऱ्या उदय देशपांडे यांना २०१७-१८ यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते, यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट
क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पंधरा जणांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विविध
क्रीडा पुरस्कारांसाठी सहा दिव्यांग खेळाडूंसह सदोतीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
****
लातूर
- नांदेड मार्गावरील घरणी गावाजवळ महामार्गावर कर्तव्य बजावणारे पोलिस नाईक नागेश चौधरी
यांचा आज टेंपोनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. टेंपोचालकानं जाणीवपूर्वक हा अपघात केल्याच्या
आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं आमच्या वर्ताहरानं कळवलं आहे.
****
सत्ताधाऱ्यांनी
विविध प्रश्र्नांची उत्तरं द्यावी आणि रोजगार द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक
कॉंग्रेसनं आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं.
****
No comments:
Post a Comment