Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
पशुंसाठी जनेरिक औषधी मिळण्यासाठी स्वस्त औषधी दुकानं
सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जालना इथं आज
अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पशुपक्ष्यांना वैद्यकीय
सेवा देण्यासाठी, आधुनिक रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहनही,
त्यांनी संबंधित विभागाला केलं. पशुसंवर्धन विभागात पशुसहाय्यक, वैद्यकीय अधिकारी आणि
विविध पदांची भरती केली जात असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भात दूध उत्पादन
वाढीसाठी शासन विविध योजना राबवत असून, २४३ कोटी रुपयांच्या योजनेतून शेतकऱ्यांना दुधाळ
जनावरांचं वाटप केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईतल्या
एलिझाबेथ रुग्णालयात निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगानं
ग्रस्त होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये
भूमिका साकारलेले रमेश भाटकर, यांची ‘अश्रूंची झाली फूले’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर
तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ यांसारखी अनेक नाटकं गाजली. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा
भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीला सुरुवात
केली होती. भाटकर यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक हिंदी
चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम
मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती, ही त्यांची
अखेरची भूमिका ठरली.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातले ज्येष्ठ
नेते माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचं आज निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. आष्टीकर
हे १९८५ आणि १९९५ असे दोन वेळा हदगाव विधान मतदार संघातून निवडून आले होते. हदगाव विधानसभा
मतदारसंघाचे आमदार नागेश आष्टीकर यांचे ते वडील होत.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना
शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, मंत्रिमंडळानं या निर्णयाला
मंजूरी दिली. या निर्णयामुळे सर्वच जाती धर्मातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना, शिक्षण
आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू होणार आहे.
राज्यातल्या गरीबांना उत्तम आरोग्य सुविधांसाठी
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही, राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. यामुळे धर्मादाय नेत्र रूग्णालयात, वैद्यकीय केंद्रात नेत्रांतर्गत शस्त्रक्रियांचा
लाभ गरीब रूग्णांना घेता येणार आहे.
****
समाजातल्या वंचित घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ
देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तालुक्यातल्या
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध कामांचा शुभारंभ केल्यानंतर त्या आज बोलत होत्या.
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून, प्रत्येक गावाला पक्का रस्ता
मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या क्षीरसागर
इथं एका गोठ्याजवळील चाऱ्याच्या गंजीला आग लागून, गोठ्यात खेळणाऱ्या तीन बालकांचा होरपळून
मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. संजीवनी मव्हारे, वेदांत मव्हारे, आणि सार्थक
कोलते अशी मृत मुलांची नावं आहेत.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण
इथं डाळींब फळ झाडांचं वाढीव मूल्यांकन करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, तत्कालिन
उपजिल्हाधिका-यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयात शेतकरी धर्मा
पाटील यांनी केलेल्या आत्महत्येनंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यातून दोंडाईचा
ऊर्जा प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनातला घोटाळा पुढे आला आहे.
//************//
No comments:
Post a Comment