Friday, 13 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१३ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** 'गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात राज्यात सर्वत्र गणरायाला भावपूर्ण निरोप; गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात २४ जण बुडाल्याच्या घटना 
** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातून सुरूवात
** आर्थिक मंदीच्या विरोधात येत्या १५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय
आणि
** दक्षिण अफ्रिकेविरूध्द मालिकेसाठी भारतीय संघातून क. एल. राहुलला वगळलं; शुभमन गिलची निवड
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर 'गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात राज्यात काल सर्वत्र गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र मुंबई, आणि पुणे शहरात अजुनही गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आहेत. राज्यात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. शेकडो नागरिकांनी आपल्या घरात किंवा अंगणातच मूर्तींचं विसर्जन केलं. प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्याचं संकलन करण्यासाठी सज्ज होत्या. औरंगाबाद इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून विसर्जन मिरवणुक निघाली.
हिंगोली इथं शहरातल्या नवसाच्या चिंतामणी गणपती इथं पावणेतीन लाख मोदकांचं वाटप करण्यात आलं.
परभणी शहरातही महापालिकेच्यावतीनं विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. नांदेड, हिंगोली, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही गणेश विसर्जन शांतते पार पडलं. सर्वच ठिकाणी पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. 
नाशिक इथं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळण्यासाठी नाशिक महापालिकेकडून अमोनियम बाय कार्बोनेट पावडरचं वितरण केलं.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, अकोला, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यातही गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
लातूर शहरात पाणी टंचाई असल्यानं यंदा गणेश मूर्तींचं विसर्जन न करता त्या प्रशासनाला दान करण्याच्या जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या आवाहनाला लातूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. लातूर शहरात पाच ठिकाणी महापालिकेच्या वतीनं मूर्ती स्विकारण्याचे केंद्र तयार केले होते.
****
दरम्यान, गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात २४ जण बुडाल्याच्या घटना घडल्या. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं एका तरूणाचा बुडून मृत्यु झाला, सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातल्या मालखेड इथं एका, तर नांदुरा तालुक्यातल्या निमगाव इथही एक युवक बुडून मृत्यू पावला.  
सिंधुदुर्गात आचरा समुद्रात आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या पडवे बंदर इथं प्रत्येकी दोघे जण बुडाल्याची घटना घडली. तर अन्य एका ठिकाणी एक युवक बुडाल्याचं वृत्त आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूरगाव इथंही गणेश विसर्जनदरम्यान तीन युवक गोदावरी नदीत बुडाले. अग्निशमन आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी दोघांना बाहेर काढलं असून, तिसऱ्या युवकाचा शोध सुरु आहे. तसंच रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली जवानांनी एका युवकाला वाचवलं. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पहिने इथंही विजर्सनावेळी एक युवक बुडाला. अहमदनगर जिल्ह्यातही श्रीरामपूर इथल्या प्रवरा नदीत आणि शेवगावमधल्या ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातल्या निमगाव इथं एका युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला.
अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
नागपूर इथं गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधल्या मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द इथं १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
ठाणे, कराड, वर्धा, धुळे आणि भंडारा जिल्ह्यातही प्रत्येकी एक युवक बुडाल्याची घटना घडली आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली. पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त झालं आहे. उर्वरीत सत्तावीस हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी रुपये हे राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाचं भागभांडवल असेल.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथून सुरूवात होत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळं अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या. आता अहमदनगर शहरासह अकोले, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा इथं सभा होणार आहेत.
****
 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
आर्थिक मंदीला कथितरित्या जबाबदार असलेल्या सरकारी धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष येत्या १५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशव्यापी आंदोलन करणार आहे. नवी दिल्लीत काल सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर प्रवक्ते आर पी एन सिंह यांनी ही माहिती दिली. सध्याच्या आर्थिक स्थितीवर नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या २० ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्य काँग्रेस समितीच्या प्रतिनिधींचं संमेलनही घेण्यात येणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
दक्षिण अफ्रिकेविरूध्द तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. संघातून के एल राहूलला वगळण्यात आलं असून, त्या ऐवजी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. उर्वरित संघ कायम आहे. पहिला कसोटी सामना दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम, गंगाखेड, पूर्णा तालुक्यात काल दमदार पाऊस झाला.  त्यामुळे नांदेड शहराजवळच्या विष्णुपुरी प्रकल्पातून काल दुपारी ४७१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातही काल सरासरी २४ मिलीमीटर पाऊस झाला.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...