Thursday, 19 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१९ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
 
Ø  आगामी विधानसभा निवडणुकीचं मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच होणार - मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांचं स्पष्टीकरण
Ø  राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले पाच उमेदवार जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागर, केज- नमिता मुंदडा, तर गेवराईमधून विजयसिंह पंडीत
Ø  भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप
आणि
Ø  बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावांना मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा येत्या एक ऑक्टोबर पासून बंद करण्याचा निर्णय
****

 मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असून, आगामी विधानसभा निवडणुकीचं मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह अशोक लवासा आणि सुशील चंद्र या निवडणूक आयुक्तांनी काल महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मतदानाविषयी जनजागृती मोहीमही राबवण्यात येईल, असं अरोरा म्हणाले.

 शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळानं उमेदवारांची निवडणूक खर्च मर्यादा ७० लाख रूपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली. सध्या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत २८ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, दिवाळीपूर्वी मतदान घेण्याची आयोगाकडे मागणी केली. राज्यात निम्म्याहून अधिक लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जातात, त्या काळात निवडणूक घेतल्यास, मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो, असं मलिक म्हणाले.
****

 आगामी निवडणुकीत तरूण राज्याला नवीन दिशा देण्याचं काम करतील असा विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते काल बीड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. सध्या नेत्यांची पळापळ सुरू असली तरी, कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं, पवार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांनी बीड विधानसभा मतदार संघातून संदीप क्षीरसागर, केज- नमिता मुंदडा, परळी- धनंजय मुंडे, माजलगाव- प्रकाश सोळंके, आणि गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी जाहीर केली. लातूर इथंही पवार यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
****

 राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी, उद्या जाहीर करू अशी माहिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी पक्षाच्या छाननी समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली. त्यानंतर थोरात यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली.
****

 भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होईल.

 दरम्यान, काल या यात्रेचं नाशिक शहरात स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाजनादेश यात्रा संपेल, मात्र विचारांची यात्रा सुरु राहील, असं सांगितलं. 
****

 इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
****

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा लाभ आता दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिली. मराठवाडा तसंच विदर्भातल्या पाच हजार १४२ गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

 बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांना मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा येत्या एक ऑक्टोबर पासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात एक बैठक घेऊन, हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षभरापासून मांजरा धरणातला पाणी साठा शून्य पातळीच्या खाली आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. यापुढे प्रति घर फक्त २०० लीटर पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवण्यात येईल, त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप हे या बैठकीला उपस्थित होते. या पध्दतीने पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी नगर परिषदेची स्वतंत्र बैठक घेऊन, निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं औरंगाबाद इथं प्रस्तावित स्मारक उभारण्याची जबाबदारी राज्य शासनानं सिडकोकडे सोपवली आहे. या स्मारकासाठी पन्नास कोटी ६१ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
****

 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं औरंगाबाद मध्य मधून कॉम्रेड विधिज्ञ अभय टाकसाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्य सचिव मंडळ सदस्य तथा राष्ट्रीय कौन्सिल सदस्य राम बाहेती यांनी ही माहिती दिली.
****

 हिंगोली जिल्ह्यात बाळापूर इथं, एक लाख अठरा हजार रुपयांचा गुटखा काल पोलिसांनी जप्त केला. बाळापूरकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली असता, विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला.
****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतासमोर १५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं सात गडी राखून हे लक्ष्य पूर्ण केलं.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...