Sunday, 2 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 पर्यावरणावरचं ओझं कमी करण्यासाठी साधं जीवन जगण्याची आणि उत्तम मनुष्य होण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. श्रीरामचंद्र मिशनच्या हैदराबाद नजिक आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. या मिशनच्या उपक्रमांबद्दल राष्ट्रपतींनी यावेळी गौरवोद्गार काढले. भारतीय परंपरा वसुधैव कुटुंबक शिकवते आणि गुरु वैश्विक समृद्धीचा मार्ग दाखवतात, असं राष्ट्रपतींनी यावेळी नमुद केलं.
****

 िर्भया प्रकरणातील दोशींच्या फाशी संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एक दोशी मुकेश याच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्य रेबेका जॉन बाजू मांडत आहेत.
****

 श्रीनगरच्या लाल चौक भागात आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.
****

 केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये गुंतवणुकीचं चक्र सुरू व्हावं आणि आर्थिक विकासाला गती मिळावी यासाठी विविध उपाय योजऩ्यात आले असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांचा सामना करण्यात अयशस्वी ठरला होता, अशी टीकाही भाजपनं केली आहे. काँग्रेसनं या अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेच्या पार्श्र्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी आज ही प्रतिक्रीया दिली आहे.
****

 राज्यातील विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून  देश निर्माण कार्यात अमुल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेलं एनसीसीचं प्रजासत्ताक दिन शिबीर तसंच स्पर्धांमध्ये राज्यातील एकशे सोळा विद्यार्थी आणि दहा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या सुरेख कामगिरीच्या सन्मानार्थ राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
****

 नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नृत्यासाठी पद्मश्री दर्शना जव्हेरी शिल्प कलेसाठी सोलापुरच्या भगवान रामपुरे, क्रीडा प्रकारासाठी  - कुस्ती प्रशिक्षक काका पवार, लोकसेवेसाठी लिंग परिवर्तीत व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या श्रीगौरी सावंत, चित्रपट प्रकारात, दिग्दर्शक, निर्माती  सई परांजपे आणि विज्ञान प्रकारात जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक डॉ. माधव गाडगीळ यांचा समावेश आहे. दहा मार्च या कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा कालिदास कलामंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार  आहे.
****

 मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, कृष्णा स्थिरीकरण प्रकल्प आणि जलयुक्त शिवार सारख्या योजना रद्द होऊ नये यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करण्याचं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबाद इथं सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची बैठक घेतली, त्यावेळी बागडे बोलत होते. येत्या ११ ते १३ तारखे दरम्यान मुख्यमंत्री, उप - मुख्यमंत्री यांच्या सोबत मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठक घेणार असल्याचं आमदार बंब यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि सम्यक विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या लोकप्रतिनीधींविरुद्ध नाराजी व्यक्त करत निदर्शनं केली.
****

 औरंगाबाद इथं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या `गेट गोईंग` संस्थेच्या मॅरेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटरमध्ये विजय ढोबळे, नितीन तळीकोटे, माधुरी चाचड, सुनिता जपोळकर यांनी विजेतेपदं पटकवली.
****

 भारतानं न्यूझीलंडविरुद्ध माऊंट माऊंगनुई इथं झालेला पाचवा टीट्वेंटी सामना सात धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारतानं मालिकेतील सर्व सामने जिंकत प्रथमच पाच-शून्य असा दणदणीत विजय नोंदवला.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...