Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठश्रेणी आणि निवडश्रेणीनुसार
पदोन्नती करताना विलंब टाळण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. औरंगाबाद
विभागातल्या प्राध्यापकांच्या विविध अडचणीसंदर्भात आज मुंबईत विधान भवनात आढावा बैठक
झाली, त्यावेळी सामंत बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठश्रेणी
आणि निवड श्रेणीमध्ये पदोन्नती करताना छाननी समिती आणि मूल्यमापन समिती गठित करुन त्याची
वेतननिश्चिती करण्यात येते. यासाठी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांनी समन्वय
राखून कार्य करावं, असं सामंत म्हणाले. तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास
पदव्युत्तर पदवीधर यांना संधी मिळावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यंदा शंभरावं नाट्य
संमेलन साजरं करणार आहे. या नाट्यसंमेलनाचं स्वागताध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलं आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी
यांच्या विनंतीवरून हे पद स्वीकारत असल्याचं, पवार यांनी एका ट्वीट संदेशाद्वारे जाहीर
केलं आहे. या ऐतिहासिक शंभराव्या संमेलनाला येत्या २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनी
सांगली इथून प्रारंभ होत असून, चौदा जूनला गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी मुंबईत
समारोप होणार आहे.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या नंदोरी मार्गावर
एका माथेफिरू तरुणाने प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं, त्यात तरूणी
गंभीर जखमी झाली असून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला नागपूरला हलवण्यात
आलं आहे. आज ही घटना सकाळी घडली असून यातला प्रमुख आरोपी विकेश नगराळे हा फरार आहे.
****
औरंगाबाद महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत आज काढण्यात
आली. एकूण एकशे पंधरा प्रभागांपैकी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष गटासाठी
प्रत्येकी ३० प्रभाग आरक्षित झाले असून, अनुसूचित जाती महिलांसाठी ११, अनुसूचित जाती
पुरुष प्रवर्गासाठी अकरा, अनुसूचित जमाती महिला आणि पुरुष प्रवर्गांसाठी प्रत्येकी
एक तर इतर मागास प्रवर्ग पुरुष तसंच महिला प्रवर्गासाठी अनुकमे सोळा तसंच पंधरा प्रभाग
आरक्षित झाले आहेत.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापती
पदासाठी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत
महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदी काँग्रेसच्या सुशीला पाटील बेटमोगरेकर यांची
निवड करण्यात आली असून बाळासाहेब पाटील रावनगावकर, संजय अप्पा बेळगे, रामराव नाईक यांची
विविध विषय समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरासह तालुक्यातील होतकरू
क्रीडापटूंना हक्काचं क्रीडा संकुल उभारण्यासाठी तालुका युवा शारीरिक शिक्षक संघटनेच्या
अध्यक्षांच्या वतीनं आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. शहरासह तालुक्यातल्या होतकरू क्रीडापटूंनी क्रीडा
संकुलाचा अभाव असतानाही स्वकर्तृत्वावर बहुतांश क्रीडा प्रकारांमध्ये जिंतूर तालुक्याचं
नाव गाजवलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये
लातूर जिल्ह्यात आलेली दुष्काळी परिस्थिती पाहता लातूर महानगरपालिकेनं सहायक अनुदान
मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे
पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या आहेत. अमित देशमुख
यांनी मंत्रालयात त्यांच्या दालनात लातूर महानगरपालिकेतल्या विविध
प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. या बैठकीस लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा भूगोल विभाग आणि विलासराव देशमुख अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं,
क्यू जीआयएस तंत्रज्ञानासंदर्भातल्या चार दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ झाला. प्रकुलगुरू
डॉ प्रवीण वक्ते यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनोटेक्नॉलाजी‘ या तीन क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित उद्योग,
संशोधनाला आता सुगीचे दिवस आहेत. त्यामुळे संशोधकांनी या तिनही क्षेत्राचा अवलंब आपल्या
संशोधनात आणि नवोन्मेष प्रक्रियेत करावा, असं आवाहन डॉ वक्ते यांनी केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदी काठावर असलेल्या पिंपळगाव
फुणगी इथं एका अडीच वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केलं. या हल्ल्यात
मुलगी बचावली, असून तिला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी
श्रीरामपूर तालुक्यात गळनिंब इथं एका बलिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment