Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
देशातल्या सहकारी बँकांना
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक नियंत्रणात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला
आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे सहकारी बँकांच्या कामकाजात अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता येईल, तसंच
सहकारी बँकांनाही व्यापारी बँकांप्रमाणे नियामक आवश्यकतांची पूर्ती करावी लागेल.
महाराष्ट्रात डहाणूजवळ
वाढवण इथे मोठं बंदर उभारण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज तत्वत: मान्यता दिली.
****
कापूस खरेदीसाठी अठराशे
कोटी रुपयांच्या शासन हमीला आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात
आली. या हंगामातल्या कापूस खरेदी साठी पणन महासंघानं बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जावर
ही शासन हमी देण्यात आली आहे.
राज्याच्या नागरी भागात
निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या सांडपाणी
प्रक्रिया प्रस्तावालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
निर्भया लैंगिक अत्याचार
आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीला कनिष्ठ न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवावी,
अशी मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली.
या आरोपींनी विविध न्यायालयीन
प्रक्रियांच्या आधारे वेळकाढूपणा केल्याबाबत दुमत नाही, असं नमूद करतानाच, २०१७ च्या
मे महिन्यात दोषींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर त्यांची डेथ वॉरंट्स
काढण्यासाठी कोणीही पावलं उचलली नाहीत, असंही न्यायालयानं म्हटलं. या चारही आरोपींना
एकाच वेळी फाशी दिली जावी, वेगवेगळ्या वेळी नव्हे, असंही न्यायालयानं आज स्पष्ट केलं.
या चारही आरोपींना या
शिक्षेबाबत कोणताही अर्ज दाखल करायचा असल्यास तो एका आठवड्यात सादर करावा,
असा आदेश न्यायालयानं दिला.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या
या निर्णयाच्या विरोधात केंद्र तसंच दिल्ली सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
आहे.
****
दरम्यान, या प्रकरणातल्या
आरोपींना लवकरच फासावर लटकवलं जाईल, असं आश्वासन कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिलं. लोकसभेत
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडसह वर्धा जिल्ह्यातल्या
हिंगणघाट इथं घडलेल्या महिला जळीत कांडाच्या मुद्याकडे शून्य प्रहरात सदनाचं लक्ष वेधलं,
अनेक सदस्यांनी, विशेषत: सगळ्या पक्षांच्या महिला खासदारांनी, देशभरात महिलांवर होणाऱ्या
हल्ल्यांबाबत सदनात आवाज उठवला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी खासदारांनी
केली. यावर, याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल, असं कायदामंत्र्यांनी सांगितलं.
****
शिक्षण आणि रोजगारामध्ये
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्याच्या कायद्याला वैध ठरवणारा मुंबई उच्च न्यायालयाचा
आदेश रद्द करण्याला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हे प्रकरण बराच काळ सुरु असून
यावर विस्तृत सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. मराठा आरक्षणाच्या
समर्थनात तसंच विरोधात अनेक याचिका
दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या सतरा मार्चला होणार आहे.
****
विद्यार्थ्यांची प्रगती
व्हावी आणि त्यांना सकस आहार मिळावा यासाठी सरकार माध्यान्ह भोजन योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून काम करत आहे, असं प्रतिपादन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून जालना
इथं उभारण्यात आलेल्या पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले केंद्रीय स्वयंपाक गृहाचं
लोकार्पण आज राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालन्यातल्या या केंद्रीय
स्वयंपाकगृहातून पहिल्या टप्य्यात पन्नास हजार विद्यार्थ्यांना भोजन दिलं जाणार आहे.
अकोला इथं डॉक्टर पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठाच्या चौतिसाव्या दीक्षान्त समारंभालाही राज्यपाल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करुन देश विकासाचा संकल्प घ्यावा असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
सेलू इथल्या साईबाबा नागरी सहकारी बँकेला २०१९च्या बँको पुरस्कारानं सन्मानित करण्यात
आलं आहे. आपल्या श्रेणीच्या सगळ्या निकषांची पूर्तता केल्याबद्दल या बँकेला सलग पाचव्या
वेळेस हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
पाच पालिकांतल्या सहा नगरसेवक पदांसाठी उद्या पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीची
मतमोजणी परवा शुक्रवारी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment