Friday, 7 February 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 07.02.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका बनवल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज राज्यसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. या योजनेअंतर्गत अनुदानित धान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाचं वैध राहतील, असं त्यांनी सांगितलं. नवीन शिधापत्रिका बनवण्याबाबत सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या निराधार असून, अशा बनावट शिधापत्रिकांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशीचे संकेत त्यांनी दिले. सध्या महाराष्ट्रासह बारा राज्यांत चालू असलेली ही योजना येत्या जून महिन्यापासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे.
****
कुपोषणाच्या समस्येचं टप्प्याटप्प्यानं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं देशभरात पोषण अभियान राबवलं जात असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत बोलत होत्या. सोयीसुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचं काम पोषण अभियाना अंतर्गत केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेली टीका ही दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी केली असल्याचं, काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत राहुल गांधी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी हर्षवर्धन यांनी, खासदार राहुल गांधी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचार सभेत, पंतप्रधानांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला. यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाल्यानं, अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदनाचं कामकाज तहकूब करावं लागलं. यासंदर्भात आपण लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन, हर्षवर्धन यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत उद्योग प्रतिनिधी, व्यापारी वर्ग, गुंतवणूकदार तसंच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी भेट घेतली. संसदेत सादर झालेल्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींबाबत अर्थमंत्र्यांनी या प्रतिनिधींशी चर्चा केली.
****
निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आता येत्या मंगळवारी सुनावणी करणार आहे. केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी चारही दोषींना नोटिस जारी करण्याची मागणीदेखील न्यायालयानं फेटाळली. या प्रकरणी देशाच्या संयमाची परीक्षा होत असून न्यायालयानं या संदर्भात काही दिशा निर्देश ठरवायला हवेत असंही मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे.
****
हिंगणघाट इथल्या जळीत प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ज्ज्वल निकम यांची नेमणूक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर द्वारे दिली आहे. दरम्यान, पीडितेच्या उपचारासाठी आवश्यक असणारे संपूर्ण सहाय्य देण्यात येत आहे. मनोधैर्य योजनेतूनही पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
****
उस्मानाबाद इथं आज आशा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आशा आरोग्य सेविकांच्या कार्याचा गौरव केला, या आशा सेविकांनी सुदृढ सशक्त आणि निरोगी भारत निर्मितीसाठी काम करत असतांनाच स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं असं आवाहन कांबळे यांनी केलं. आगामी काळात या सेविकांना विमा संरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि चार अ या दोन्ही जागा कॉंग्रेस पक्षानं जिंकल्या आहेत. जिल्ह्यात पाच पालिकांच्या पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागांवर कॉंग्रेस पक्ष तर एक जागा अपक्षानं जिंकली आहे.
परभणी महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या खान शहनाजबी या विजयी झाल्या. त्यांना चार हजार २७९ मतं मिळाली.
****
सांगली महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी भाजपचेच आनंदा देवमाणे हे विजयी झाले आहेत. गीता सुतार यांना ४३ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ मतं पडली.
****
लातूर इथं विभागीय महसूल आणि क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धांचं उद्धाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते आज झालं. या स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, जालना बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या जवळपास चौदाशे खेळाडूंनी  विविध १४ क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला आहे.
****
सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या भारतात जातीय, धार्मिक भावनअत्यंत टोकदार बनल्याचं माजी उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.ए.पठाण यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचं उद्धाटन डॉ पठाण यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. देश सामाजिक दुभंगतेच्या उंबरठ्यावर असून संतसाहित्याचा अभ्यास हाच यावर उतारा ठरेल असं पठाण यांनी यावेळी नमूद केलं.
//**********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...