Saturday, 8 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.02.2020 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. सकाळी दहा वाजेपर्यंत चार पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी आम आदमी पार्टी तसंच काँग्रेस आणि भाजप दरम्यान तिरंगी लढत दिल्ली विधानसभेत होत आहे. या निवडणुकीत एक कोटी चाळीस लाख मतदार सहाशे बहात्तर उमेदवारांचं भवितव्य ठरवत आहेत.
****

 रेल्वेच्या कामांचं  खाजगीकरण करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये  व्यावसायिक आणि अन्य काही सेवां बाहेरुन घेण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर काही निवडक मर्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये आधुनिक पद्धतीचे डबे खाजगी कंपन्यांकडून बनवून घेण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****

 शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगाव न्यायालयानं दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. काल या खटल्याची सुनावणी होती, मात्र सुनावणीस भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****

 भारतानं न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा न्यूझीलंडच्या चव्वेचाळीस षटकांत आठ  बाद  २१३ धावा झाल्या होत्या. गुप्तीलच्या ७९ आणि निकोलसच्या ४१ धावांचा यात समावेश होता. शार्दूल ठाकूरनं दोन आणि चहलनं तीन गडी बाद केले होते. 
****

 नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेहचाळीस हजार शेतकरी कर्ज मुक्तीसाठी पात्र असून त्यापैकी नव्व्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डानं जोडण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. आता केवळ ३९८ खाते आधार लिंक होणं बाकी आहे. लाभार्थी एक लाख एकोणीस हजार ३०९ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. 
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...