Saturday, 8 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.02.2020 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****

 भारत दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासध्या नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा सुरु आहे. आपल्या शिष्टमंडळासह पाच दिवसांच्या भारत भेटीवर असलेले राजपक्षे आज सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राजपक्षे यांची ही पहिलीच भारत भेट आहे.
****

 दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पंधरा पुर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच राहुल गांधी, प्रियंका गांधी आदींचाही सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांत समावेश होता. सत्ताधारी आम आदमी पार्टी तसंच काँग्रेस आणि भाजप दरम्यान तिरंगी लढत दिल्ली विधानसभेत होत आहे. या निवडणुकीत एक कोटी चाळीस लाख मतदार सहाशे बहात्तर उमेदवारांचं भवितव्य ठरवत आहेत.
****

 समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व बारा प्रमुख बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं.
****

 रेल्वेच्या कामांचं  खाजगीकरण करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये  व्यावसायिक आणि अन्य काही सेवां बाहेरुन घेण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर काही निवडक मर्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये आधुनिक पद्धतीचे डबे खाजगी कंपन्यांकडून बनवून घेण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****

 नवी मुंबईतल्या नेरुळ परिसरातल्या  एका  इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग अग्नीशमन दलानं विझवली आहे. मात्र, या ठिकाणी नंतर पहाणी करण्यासाठी नेरूळ केंद्र अधिकारी गेले असता गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
****

 भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा चौदा षटकांत चार बाद एक्काहत्तर धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि केदार जाध‍व फलंदाजी करत होते. तत्पूर्वी न्यूझीलंडनं पन्नास षटकांत आठ बाद २७३ धावा केल्या. गुप्तीलच्या एकोणऐंशी, टेलरच्या त्र्याहत्तर धावा यात प्रमुख होत्या. चहलनं तीन आणि ठाकूरनं दोन गडी बाद केले होते.  तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामना जिंकून न्यूझीलंड एक -शून्यनं आघाडीवर आहे.
****

 ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं 20 षटकात 5 बाद 173 धावा केल्या. भारतानं हे आव्हान दोन चेंडू राखत, तीन गड्यांच्या मोबदल्यात, 177 धावा करत पार केलं.
****

 फिलिपिन्समध्ये मनिला इथं येत्या अकरा ते सोळा फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघानं माघार घेतली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे. पुरुषांचा संघ मात्र या स्पर्धेत सहभागी होणार असून आज रात्री संघ मनिलासाठी रवाना होणार आहे.
****

 औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात येत्या तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान एकोणतीसाव्या फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत राजकीय नेते उल्हास पवार, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार वृंदा करात, महाराष्ट्र टाईम्स मुंबईचे वरिष्ठ संपादक विजय चोरमारे यांचं व्याख्यान होणार आहे.
****


बीड जिल्ह्याच्या  अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी महाविद्यालयात ’मराठवाड्याच्या विकासाचा असमतोल’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उद्या होणार  आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेची  बीड शाखा आणि  अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत सिंचन अनुशेष, यासह शिक्षण, कृषी आणि उद्योग क्षेत्रातील अनुशेष या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं तसंच चर्चा होणार आहेत.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...