Sunday, 9 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.02.2020 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****

 पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत मोर्चा सुरू होत आहे. गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग आहे. मुंबईसह राज्यभर या मोर्चाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. राज्यातील ठिकठिकाणचे मनसे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी आहेत. फलक, भित्ती पत्रकं तसंच समाज माध्यमांतून या मोर्चासाठी मनसेनं मोठी वातावरण निर्मीती केली आहे. पोलीसांनी मोर्चाच्या मार्गावर चोख  बंदोबस्त ठेवला आहे.
****

 दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठरवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्रीलंका तमिळ समुदायाच्या समानता न्याय आणि शांततेचा सन्मान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. श्रीलंकेचं स्थैर्य, सुरक्षा आणि भरभराट ही केवळ भारताच्याच नव्हे तर, संपूर्ण हिंदी महासागर प्रदेशाच्या हिताची आहे, असंही ते म्हणाले. या चर्चेत दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत विचार विनिमय केला, तसंच व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्याचंही ठरवलं. श्रीलंकेच्या विकासात भारत हा विश्वासू भागीदार असून शांतता आणि विकासाच्या त्या देशाच्या प्रवासात भारत सहाय्य करणं सुरू ठेवणार आहे, असं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं. गेल्या वर्षी श्रीलंकेला दिलेल्या नव्या कर्जामुळे या दोन शेजारी राष्ट्रांमधलं सहकार्य आणखी मजबूत होईल. मच्छीमारांच्या प्रश्नांवर मानवतावादी भूमिका घेण्यात येईल, असं मोदी म्हणाले. आपल्या निवेदनात राजपक्षे यांनी मोदी यांच्या शेजाऱ्याचं हित प्रथम पाहण्याच्या धोरणाबद्दल त्यांचं आभार मानले. राजपक्षे यांचं काल पाच दिवसांच्या भारत भेटीवर आगमन झालं आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा `मन की बात` हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन येत्या तेवीस तारखेला प्रसारीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कल्पना आणि विषय कळवावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. सर्वसामान्य नागरिक आपले विचार १८००११७८०० या क्रंमाकावर संदेशाद्वारे  किंवा `नमो अॅप` आणि `माय जियो वी` या संकेत स्थळांवर कळवू शकतात. शिवाय १९२२ या क्रमांकावर `मिस कॉल` देवूनही आपल्या कल्पना कळवता येतील.
****

 दिल्ली विधानसभेसाठी काल झालेल्या निवडणुकीत सुमारे एकसष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. रणबिर सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते काल मतदानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मतदान शांततेत पार पडलं असून काही ठिकाणची आकडेवारी आल्यानंतर ही टक्केवारी वाढू शकते असंही ते म्हणाले. गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सदूसष्ट टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीच्या कालावधीत एकूण बारा कोटी रूपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या निडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे.
****

 राज्यात कोरोनाचे संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहा जणांपैकी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या एका चीनी नागरिकाचाही समावेश आहे. राज्यातील ३० रुग्णांच्या चाचणीचे निष्कर्ष आले असून एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इतर पाच जणांच्या चाचणीचे निष्कर्ष अजून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडून प्राप्त झाले नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
****

 दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम  सामना  होणार आहे. भारत या स्पर्धेचा माजी विजेता आहे. या स्पर्धेच्या अंतिमफेरीत बांगलादेश हा पहिल्यांदाच पोहोचला असून भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत आपला एकही  सामना गमावलेला नाही. पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीत आलेल्या भारतानं आतापर्यंत सात वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला असून बांगलादेशही दक्षिण अफ्रिका आणि न्युझिलंड सारख्या बलाढ्य संघांना हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुपारी दिड वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...