Sunday, 9 February 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 09.02.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात सीएए आणि एनआरसी संदर्भातील कार्यवाही सरकारनं तातडीनं पूर्ण करावी तसंच आर्थिक अराजकता लपवण्यासाठी कायदे आणले जात आहेत का, हे स्पष्ट करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं आज मुंबईत घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते. या देशाचे खूप प्रश्न आहेत पण बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचाही तितकाच मोठा प्रश्र्न असल्याचं ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
****
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शासनानं तुरीला प्रती क्विंटल पाच हजार आठशे रूपये हमीभाव जाहीर केला मात्र, प्रत्यक्षात चार हजार तिनशे रूपये भाव मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. कापूस, सोयाबीन आणि उसालाही योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफीचा दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाहणी करून एकरी पंचवीस हजार रूपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता केंद्रानं मदत दिली तर ही मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज औरंगाबाद इथं बैठक झाली. या बैठकीत मारूती वराडे, माऊली मुळे, चंद्रशेखर साळुंके, कृष्णा साबळे यांची जिल्हाध्यक्षपदी आणि आझम खान यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मुक्ताराम गव्हाणे यांची यावेळी विभागीय पदाधिकारीपदी निवड करण्यात आली.
****
येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.  “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार असून अर्जावरील कार्यवाहीची माहिती लाभार्थ्याला पाठवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत आणि योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असं कृषीमंत्री भुसे यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधानांची `नव्या भारताची` संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरकार भागधारक आणि उद्योगासोबत सतत काम करत राहील, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. कोलकाता इथं आज `बजेट -२०२०` कार्यक्रमात व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सरकारची भूमिका तंत्रज्ञानाची सुविधा देणारी असेल तसंच उद्योजक आणि 'डिजिटल इंडिया' क्षेत्रात पुढाकार घेऊन नव्या भारताची संकल्पना यशस्वी होईल, असं त्या म्हणाल्या.
****
औरंगाबाद इथं आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज होत आहे. यावेळी तिसरा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात येणार असून त्यानंतर ऑस्कर नामांकित पॅरासाईट चित्रपट दाखवला जाणार आहे.
****
अमरावती विभागात गेल्या जानेवारी महिन्यात विविध संकटांनी त्रस्त साठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यात वीस आणि यवतमाळमध्ये सोळा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कर्जमाफी, कर्जमुक्ती योजनांच्या दिलास्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण काही अंशी कमी झाल्याचं अहवालात नमुद आहे.
****
पाथ्रीचं साईधाम असं नामकरण करावं, या मागणीसाठी सेलू ते पाथ्री अशी पायी दिंडी आज काढण्यात आली. सेलू इथं केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या आरतीनं दिंडीला सुरुवात झाली आणि पाथ्रीच्या साईबाबा मंदिरातील आरतीनं समारोप झाला.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतानं बांगलादेशा समोर विजयासाठी १७८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...