Monday, 10 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.02.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या शिक्षेकेच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीनं प्रयत्न करावेतयासाठी संबंधित यंत्रणांना गतीमान केलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आरोपीला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले असल्याचं ते म्हणाले. राज्याला पुरोगामी परंपरा असून माता – भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख असल्याचं त्यांनी मुद केलं. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतलं जाणार नाही तसंच स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही  पिडीतेच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पीडितेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ती वाचू शकली नाही, याचं दुःख वाटतं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पिडीत शिक्षीकेच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासनही देशमुख यांनी दिलं आहे.
****

 पीडित शिक्षिकेचा आज नागपूर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या पार्थीव देहावर दारोडा इथं शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिडीतेच्या मृत्यूनंतर दारोडा या तिच्या गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला त्वरीत शिक्षा करावी या मागणीसाठी वर्धा – औरंगाबाद महामार्गावर दोन तास `रस्ता बंद` आंदोलन केलं. पोलिसांना गावात झालेल्या दगडफेकीनंतर सौम्य बळाचा वापर करावा लागला.  
****

 या प्रकरणी खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उदगीर इथं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आज या प्रकरणी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.  
****

 सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या निकालानंतर या कायद्यात केलेल्या सुधारणा, रद्द केल्या जाव्यात, या मागणीसाठी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर न्यायालयात आज सुनावणी झाली. 
****

 बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा अधिक सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसंच नवे बदल स्वीकारावेत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्य सहकारी बँकांच्या संघटनेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी कामकाजात बदल करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली.
****

 जालना जिल्ह्यातील अंबड इथं आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नाफेडच्या तूर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर तुरीला पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात येणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी यासाठी आँनलाईन नाव नोंदणी करावी, असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं.
****

 सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दहा लाख रुपयांची सुपारी घेऊन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. आनंदराव पाटील यांची दोन फेब्रुवारीला व्यक्तीगत वादातून हत्या करण्यात आली होती.
****

 नांदेड जिल्ह्य़ाच्या अर्धापुर तालुक्यातील मालेगाव इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता दुकानदार ऊर्फ दतराव इंगोले मालेगावकर यांचं आज सकाळी साडे नऊ वाजता अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षे वयाचे होते. दत्ता दुकानदार हे मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडा चे संचालक होते.
****

 औरंगाबाद जील्ह्यातील गंगापूर तालुक्यातील माळीवडगांव इथला ग्रामसेवक राजेंद्र जयराम रावते याला आज पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागानं अटक केली. रमाई आवास योजने अंतर्गत तक्रारदाराचं नाव पडताळणी कामी पाठवल्याचं बक्षीस म्हणून लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
****

 नांदेड जिल्ह्यातील कंधार इथं आज जागतिक कडधान्य दिवस साजरा करण्यात आला. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना यावेळी संबंधित उपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आलं.
****

 सोलापूर इथं आज महादेव कोळी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...