Saturday, 15 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.02.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१५ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  दूरसंचार कंपन्यांविरोधात न्यायालय अवमानना प्रकरणी कारवाई का करू नये - सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Ø  एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुंबई न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश
Ø  केंद्रीय अर्थसंकल्पाविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभर निदर्शनांचा इशारा
आणि
Ø  िविध अकरा ठराव संमत करून पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप
****

 दूरसंचार कंपन्यांविरोधात न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी कारवाई का करू नये, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे. दूरसंचार कंपन्यांकडे असलेली एक लाख ४७ हजार कोटी रुपयांचा समायोजित सकल महसुलाची थकबाकी भरण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते, त्यांचं पालन न केल्याबद्दल न्यायालयानं काल याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढले. याप्रकरणी दूरसंचार कंपन्यांच्या संचालकांना येत्या १७ मार्चला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
****

 दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक दोषी विनय शर्मा याने दाखल केलेली, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आपल्या दयेच्या अर्जावर दुर्भावनेतून विचार करण्यात आल्याचं, त्यानं या याचिकेत म्हटलं होतं. या प्रकरणातल्या चार दोषींपैकी पवन गुप्ता या एकाच दोषीचे दयेचे पर्याय आता खुले आहेत.
****

 रुग्णालयांच्या शुल्कात होत असलेल्या वाढीबद्दल विमा नियामक आणि विकास प्राधिकरण संस्था - आय.आर.डी.ए.आयनं चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालयांच्या शुल्कात दरवर्षी १० ते १५ टक्क्यांची वाढ होत आहे, मात्र त्यावर कोणाचंही नियंत्रण नसल्याचं संस्थेच्या सदस्या टी. एल. अलामेलू यांनी म्हटलं आहे. मोतीबिंदू, कुटुंब नियोजन यासारख्या शस्त्रक्रियांचे विविध रुग्णालयांमधले शुल्क एकसमान करण्यासाठी जनरल इन्शुरन्स कौन्सिल विविध टीपीएसोबत चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
****

 वाढत्या नागरिकीकरणामुळे लोकप्रशासनापुढे नवीन आव्हानं निर्माण होत असून, त्यावर अधिक कार्यक्षमतेनं मात करावी लागेल, असं मत निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्यावतीनं मुंबईत मंत्रालयात आयोजित बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानात ते काल बोलत होते. उपलब्ध साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर, पर्यावरणीय परिसंस्थांचं जतन, ऊर्जा निर्मितीसाठी अपारंपरिक स्रोतांचा वापर, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, उत्तम दळणवळण व्यवस्था आदी बाबींना यापुढील काळात अधिक महत्त्व असेल, असं ते म्हणाले.
****

 एल्गार परिषद प्रकरणी सुनावणी करत असलेल्या पुणे न्यायालयानं हे प्रकरण काल राष्ट्रीय तपास संस्था -  एनआयएच्या मुंबई न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले आहेत.

 दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह होती, याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्यानं केंद्रानं राज्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****

 एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी कथित संबंधांप्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी याकरता चार आठवडाभरापर्यंत अटक करू नये, असे निर्देशही न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी या प्रकरणी दिले आहेत.
****

 विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता १६ इतर शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अनुदान मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
****

 केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठीत  महाराष्ट्र राज्य  संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला. सावंत यांचं कार्यालय नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन इथं असेल.
****

 केंद्रीय अर्थसंकल्पाविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीनं देशभर निदर्शनं केली जाणार आहेत. भाकप नेत्या वृंदा करात यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकार आपल्या अर्थसंकल्पाद्वारे खाजगीकरणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआरची आवश्यकता नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

 दरम्यान करात यांनी काल औरंगाबाद इथं, फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत भारतीय महिला सबलीकरण या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं. जात, धर्म, परंपराचा एक हत्यार म्हणून वापर करत महिलांना नेहमी उपेक्षित ठेवण्यात आलं आहे. या विरोधी आवाज उठवला तरचं महिला सशक्त होवू शकतात, असं मत करात यांनी यावेळी व्यक्त केलं. महिला आणि पुरूषांच्या कामांच्या बरोबरीचा अधिकार भरून काढण्यासाठी समाजाच्या सध्याच्या गतीनुसार २०८ वर्ष लागतील, असं त्या म्हणाल्या.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फक्त झेंडा बदलला आहे, भूमिका बदलेली नाही, असं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. आपल्याला `हिंदू जननायक` संबोधलं जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्र्नाच्या उत्तरात नमूद केली. ठाकरे यांनी काल शाखा अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केली असून, औरंगाबाद महापालिका निवडणुकीनिमित्त शहराच्या अडचणी, समस्यांविषयी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
****

 बीड जिल्ह्याच्या पालवण इथल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप झाला. उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करुन या संमेलनाचा समारोप करण्यात आला. या संमेलनात एकूण ११ ठराव संमत करण्यात आले. देवराईचं  संवर्धन, वडाच्या तोडणीस बंदी, वड तोडीचं उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा, वृक्षारोपण करताना भौगोलिक रचनेनुसार स्थानिक वृक्षांचा समावेश करावा, आदी ठरावांचा यात समावेश आहे. दोन दिवस चाललेल्या या संमेलनास मदत करणारया दानशूर व्यक्तींचा सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. क्रांती बांगर हिनं जगातल्या पहिल्या वृक्ष सुंदरीचा किताब पटाकावला. सयाजी शिंदे यांच्या हस्ते चांदीचा मुकूट परिधान करून तिचा गौरव करण्यात आला.
****

 लातूर इथं येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला होणाऱ्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार धीरज देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष कालिदास माने यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या संमेलनाचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव हे आहेत. या संमेलनात शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
****

 गरिब आणि श्रीमंतांमधली विषमता दूर करणं, हे लोकशाही पुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. फक्त नोकरी देणारं शिक्षण पुरेसं नसून, नोकरी निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****

 उस्मानाबाद इथले प्रसिद्ध विधिज्ञ सचिन देशपांडे यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते ४५ वर्षांचे होते. उस्मानाबाद नगर परिषद, बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

 काश्मीरमधल्या पुलवामा इथं जवानांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं काल ठिकठिकाणी हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. हिंगोली शहरातल्या गांधी चौकात ज्येष्ठ नागरिक, युवक, व्यापारी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****

 गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये काल गॅस सिलिंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत महिलांसाठी मोफत गॅसजोडणी दिली परंतु सिलिंडरचे भाव वाढवले, अशी तक्रार यावेळी आंदोलकांनी केली.
****

 उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यशाळेचा काल समारोप झाला. कर्तबगार महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलगी वाचवा असं आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी केलं.
****

 जालना जिल्ह्यातल्या मंठा पंचायत समितीमधला कंत्राटी ग्रामीण गृह अभियंता कृष्णा भाकरे याला काल दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. मंजुर झालेल्या घरकुल योजनेचा अंतिम धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****

 हिंगोली नगरपालिकेनं काल एका गोदामावर छापा मारून दोन लाख रुपये किमतीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्या वापरावर आळा बसेल असा विश्वास नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...