आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ फेब्रुवारी
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय अर्थसंकल्प गुंतवणूक, कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला
चालना देईल असा विश्वास व्यक्त करत, उद्योग जगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.
या अर्थसंकल्पात, उद्योगाला अनुकूल अनेक योजना असल्याचं वाणिज्य आणि व्यापार महासंघाचे
महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे वैयक्तिक पातळीसह,
उद्योग आणि राष्ट्राला सक्षम करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे, असं वाणिज्य आणि
उद्योग महासंघ- फिक्कीनं म्हटलं आहे.
****
चीनमधील भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान देखील
नवी दिल्लीमध्ये दाखल झालं आहे. यामध्ये ३२३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सात मालदिवी
नागरिकांचा देखील या विमानात समावेश आहे. या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे
चौदा दिवस हरियाणातल्या मानेसर इथल्या विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
****
निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली
उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दोषींच्या फाशीला देण्यात आलेल्या स्थगितीला
आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारनं न्यायालयात सादर केली आहे. याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी
दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
****
नांदेड जिल्ह्य़ाच्या मुदखेड इथं आज चौदावं राज्यस्तरीय
लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. समेंलनाच्या
अध्यक्षपदी ललीता गादगे या असून यात महिला सबलीकरण या विषयावर परिसंवाद, कथाकथन, नृत्य
आविष्कार, कविसंमेलन होणार आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास आणि शिक्षण प्रसारक
मंडळ करकाळा या संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती संमेलनाचे
संयोजक दिगंबरराव कदम यांनी दिली आहे.
****
औरंगाबादेतील प्रसिध्द आयुर्वेद तज्ञ डॉ. शब्बरभाई
दवासाज यांचं काल रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्यानं निधन झालं. त्यांचा दफनविधी
बोहरा कब्रस्तान इथं आज दुपारी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment