Monday, 3 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 03.02.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 03 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यसभेचं कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला, त्यावरून सभापतींनी सदनाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित केलं. तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र उपसभापती हरिवंश यांनी त्यांना परवानगी नाकारत, प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे उपसभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
लोकसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरही आक्षेप घेत, काँग्रेस सदस्यांनी घोषणबाजी केली. शून्य प्रहरातही विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच होता. गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी दीड वाजेपर्यंत स्थगित केलं.
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार आहे. लोकसभेत खासदार प्रवेश वर्मा तर राज्यसभेत भूपेंद्र यादव हे धन्यवाद प्रस्ताव सादर करतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गेल्या शुक्रवारी राष्ट्रपतींनी दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण केलं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या उल्लेखावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी केली होती.
****
देशात या वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत सातशे तेवीस प्रधानमंत्री कौशल्श विकास केंद्र उभारण्यात आली आहेत. कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. नवसाक्षरांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, आणि त्यांचं व्यावसायिक कौशल्य वाढावं, या उद्देशाने देशभरात जनशिक्षण संस्थान ही कार्यरत असल्याचं, पांडे यांनी सांगितलं.
****
भारतीय नागरिकांनी सध्या चीनचा प्रवास करू नये, अशी सूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. चीनला जाण्यास इच्छुक प्रवाशांना सरकारकडून व्हिसा नाकारण्यात येत असून ऑनलाइन व्हिसा प्रणालीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. १५ जानेवारी नंतर चीनच्या दौऱ्यावरून येणाऱ्या प्रवाशांना एका विशिष्ट कक्षात ठेवण्याची व्यवस्था केल्याचंही या बाबतच्या वृतात म्हटलं आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक संशयित आढळला आहे. या रुग्णासह पूर्वीच्या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात  असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता ३६१ झाली आहे.
****
शाऴांमधे कौशल्य विकास कार्यक्रम अनिवार्य करण्यात यावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी केलं आहे. ते काल कर्नाटकमध्ये हुबळी इथं देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. शालेय शिक्षणासोबत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी पाठ्यक्रमात या अभ्यासक्रमाचा समावेश होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. दरम्यान, उपराष्ट्रपतींनी काल हुबऴी- धारवाड गतिमान बस प्रणालीचं उदघाटन केलं, पर्यावरणास अनुकूल आणि अर्थिकदृष्टया परवडणारी परिवहन प्रणाली असावी असं मत उपराष्ट्रपतींनी यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केलं.
****
नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातल्या ईलेक्ट्रॉनिक शाखेच्या विध्यार्थ्यांनी बास्केटबॉल सामन्यात वापरला जाणारा आधुनिक गुणफलक तयार केला आहे. बाजारात उपलब्ध गुणफलकांपेक्षा हा गुणफलक खूप स्वस्त आहे. अशा मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशातल्या विविध कंपन्यांना आपल्या शिक्षणसंस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे, असं शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव नरेंद्र चव्हाण यांनी  सांगितलं आहे.
****
वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली डव्हा यात्रा सुरू झाली असून या यात्रेत जिल्ह्यातील हजारो शेतकरी नाथ नंगे महाराजाच्या दर्शनाला येतात. यात्रेचं औचित्य साधून शेतकऱ्याना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उदात्त हेतूने वाशिम जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं भव्य कृषी प्रदर्शनांचही आयोजन केलं जातं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संगणकशास्त्र विभागाच्या 'ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी' या विषयावरच्या राष्ट्रीय कार्यशाळेला आजपासून प्रारंभ होत आहे. देशभरातून ३० प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...