Tuesday, 4 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 04.02.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
आज जागतिक कर्करोग दिन जगभरात पाळला जात आहे. संशोधकांनी आणि तज्ञांनी कर्करोग थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी जागरुकता करावी असं अवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे. या रोगाचं निदान तत्काळ होण्यासाठी आणि त्याच्या उपचारासाठी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी खेड्यात आणि शहरी भागात कर्करोगाच्या नियमित तपासण्या करणं आवश्यक असल्याचं, नायडू यांनी म्हटलं आहे. जागतिक कर्करोग सप्ताहानिमित्त आज गडचिरोली इथं कर्करोग जनजागृती फेरी काढण्यात आली. या संदेश फेरीत विद्यार्थी आणि परिचारिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुमित बाजोरिया यांचा पराभव केला आहे.
****
विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करावा, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात इंक अलाइव्ह या व्यंगचित्र कलेच्या कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कलांची ओळख करून द्यावी, उत्तम कलेला मरण नाही, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं. प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार शि द फडणीस यांनी यावेळी उपस्थितांना रंगरेषांचं प्रात्यक्षिक दाखवलं.
****
सांगली जिल्ह्यातून यावर्षी युरोपियन देशांकडे ५१७ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम द्राक्षांना मळ्यातच ९० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. १५ फेब्रुवारीपासून ही निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दोन हजार एकशे तेरा शेतकऱ्यांनी अकराशे चौसष्ट हेक्टर द्राक्षबागांच्या निर्यातीसाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात नोंदणी केली आहे.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी काल विविध मागण्यांसाठी कुलगुरू कार्यालयासोमार ठिय्या आंदोलन केलं. वसतीगृह शुल्क कमी करण्यात यावं, कृषी पदवीला व्यावसायिक दर्जा घोषित करावा, परीक्षेनंतर ४५ दिवसांमध्ये निकाल लावावेत तसंच २०१९ साली विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ वस्तीगृह उपलब्ध करून द्यावं या मागण्यांचा यात समावेश आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...