Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 February
2020
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०३ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** विविध धर्म आणि धार्मिक स्थळी महिलांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
** शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या
शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्याच्या
कृषी मंत्र्यांच्या सूचना
** नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव
पुरस्कार जाहीर
आणि
** अंतिम सामन्यातही विजय मिळवत न्यूझीलंडविरुद्धची पाच टी ट्वेंटी
क्रिकेट सामन्यांची मालिका, भारतानं
पाच - शून्यनं जिंकली
****
विविध धर्म आणि धार्मिक स्थळी महिलांबाबत
केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दलच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ या याचिकांवर सुनावणी करणार असून, केरळचं शबरीमला मंदिर, मशिदीत महिलांना प्रवेश बंदी, खतना
प्रथा, आदींचा यात समावेश आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया सामुहिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानं
दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत महाधिवक्ता तुषार मेहता यांनी
सरकारची बाजू मांडली. दोषी
कायद्याचा दुरुपयोग करत असून, ज्यांचे
सर्व कायदेशीर पर्याय संपले, त्यांना
फाशी द्यावी, असं ते म्हणाले. सर्व दोषी फाशीची शिक्षा पुढे ढकलत असल्याचा आरोपही मेहता यांनी
केला.
****
शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवणाऱ्या विविध शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक
तयार करुन राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यासाठी
तालुकास्तरावर अभियान घ्यावेत, असे
निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. पुणे इथं कृषी आयुक्तालयाच्या
सर्व विभागांच्या बैठकीत ते बोलत होते. महिनाभरात ही बॅंक तयार करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. योजनांची
अंमलबजावणी करतांना ज्या समस्या येतात त्यावर मार्ग काढला जातो, मात्र त्यामुळे बऱ्याचदा यंत्रणेला रोषाला सामोरं जावं
लागतं, हे टाळण्यासाठी काय करू
शकतो आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा
झाली.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, कृष्णा - भिमा स्थिरीकरण प्रकल्प आणि जलयुक्त शिवार सारख्या योजना मार्गी
लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करण्याचं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार
हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद
इथं काल आमदार प्रशांत बंब यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची
बैठक बोलावली होती, त्यावेळी
बागडे बोलत होते. या
बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या लोकप्रतिनीधींनी पाठ फिरवल्यामुळे
त्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या
११ ते १३ तारखेदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां सोबत मराठवाड्यातल्या पाणी
प्रश्नासंदर्भात बैठक घेणार असल्याचं आमदार बंब यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि सम्यक विद्यार्थी आघाडीच्या
कार्यकर्त्यांनी जे लोकप्रतिनीधी आले नाहीत त्यांना बांगड्याचा आहेर पाठवणार असल्याचं
सांगत गोंधळ घातला.
****
नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरचे गोदावरी गौरव
पुरस्कार काल जाहीर झाले. नृत्यासाठी पद्मश्री दर्शना जव्हेरी यांना, शिल्पकला - सोलापुरचे
भगवान रामपुरे, क्रीडा - कुस्ती प्रशिक्षक काका पवार, लोकसेवा - लिंग परिवर्तीत व्यक्तींना
ओळख मिळवून देण्यात योगदान देणा-या
श्रीगौरी सावंत, चित्रपट - दिग्दर्शक, निर्माती
सई परांजपे आणि विज्ञानासाठी जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक डॉक्टर. माधव गाडगीळ यांना हे पुरस्कार जाहीर झाले. २१ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
कोणत्याही भारतीय नागरिकांवर विदेशात कर भरणा बाकी नसेल, तर
तो भारताचा रहीवासी मानला जाईल, असा
प्रस्ताव वित्त विधेयक-२०२०मध्ये
असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सांगितलं आहे. विदेशात प्रत्यक्षात नोकरी करणाऱ्या भारतीय नागरिकांना भारतीय कर प्रणालीच्या कक्षेत आणणं, हा या तरतुदीचा उद्देश नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. कर नियमांचा होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी ही तरतूद केल्याचं मंडळानं काल सांगितलं. काही भारतीय नागरिक भारतात कर वाचवण्यासाठी कमी कर आकारणाऱ्या, किंवा कर नसणाऱ्या देशात आपला अधिवास दाखवत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर विधेयकात ही तरतूद करण्यात आली असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं
स्पष्ट केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. परभणीत रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळं शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्याचबरोबर
तुरुतपीर बाबांच्या यात्रेच्या आलेल्या
व्यापारी आणि भाविकांची या पावसामुळे
तारांबळ झाली.
नांदेड इथही रात्री आठच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकरसह
अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला तर बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा भागात पाऊस झाल्याचं वृत्त
आहे. हिंगोली जिल्ह्यात आडगाव
रंजे, आखाडा बाळापूर, वारंगा, डोंगरकडा, जवळा पांचाळ या भागात पाऊस
पडल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लातूर तालुक्यातल्या बोरी इथं काल तिरंगा
रॅली काढण्यात आली. केंद्र
सरकारनं आणलेल्या नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढलेल्या या रॅलीत
नागरिक तिरंगा ध्वज, फलक
घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या राजूर इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ
तिरंगा रॅली काढण्यात आली. हजारोंच्या
संख्येनं ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
****
लातूर इथं स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत काल लेखिका वीणा गवाणकर यांची प्रकट
मुलाखत घेण्यात आली. पर्यावरण
अभ्यासक पत्रकार अतुल देउळगावकर यांनी गवाणकर यांची मुलाखत घेतली. आपल्या लिखाणातले चरित्र नायक हे सामान्य पंरतु असामान्य कर्तृत्व केलेले असल्याचं त्या म्हणाल्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची गवाणकर
यांनी यावेळी माहिती दिली.
****
औरंगाबाद इथं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या
`गेट गोईंग` संस्थेची
मॅरेथॉन स्पर्धा काल पार पडली. यामध्ये
दहा किलोमीटरमध्ये विजय ढोबळे, नितीन
तळीकोटे, माधुरी चाचड, सुनिता जपोळकर यांनी विजेतेपदं पटकवली. पाच किलोमीटरमध्ये विजय ढोबळे, राम लिंबारे तसंच गायत्री गायकवाड, निता मनियार विजेत्या ठरले.
लातूर इथंही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. एक धाव आरोग्यासाठी हे या स्पर्धेचं ब्रीदवाक्य होतं सार्वजनिक
बांधकाम राज्यमंत्री
संजय बनसोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. तीन, पाच आणि दहा किलोमीटर गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
संजय बनसोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. तीन, पाच आणि दहा किलोमीटर गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं त्र्यंबक आसरडोहकर पत्रकारिता
पुरस्काराचं जेष्ठ संपादिका राही भिडे यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं. पत्रकार विद्या गावंडे यांना
हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आकाशवाणीचे सेवानिवृत्त उद्घोषक अनंत काळे, जेष्ठ मुक्त पत्रकार अमर हबीब यांच्यासह
अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
जालना इथं १८ व्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचा काल
समारोप झाला. या दोनदिवसीय संमेलनात मान्यवर
साहित्यिकांनी साहित्यातल्या विविध प्रकारांबद्दल युवकांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर इथं काल चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षा उलटून झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर एक बालिका आणि
चार महिला जखमी झाल्या. माहूर
गड परिसरातील घाटात निळकंठेश्वर मंदीराजवळ ही घटना घडली.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सोनखेड इथं `मायनॉरीटी डॉक्टर्स असोशिएशन` आणि
ग्राम पंचायतीतर्फे काल रोगनिदान शिबीर घेण्यात आलं. आमदार मोहन हंबर्डे यांच्या
हस्ते शिबीराचं उद्घाटन झालं.
****
न्यूझीलंडविरुद्धची पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं पाच - शून्य अशी जिंकली आहे. काल झालेला अखेरचा सामना भारतानं सात धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं रोहीत शर्माच्या ६० आणि के. एल. राहुलच्या
४५ धावांच्या बळावर निर्धारित २० षटकात
१६३ धावा केल्या. न्यूझीलंडचा
संघ निर्धारित षटकात नऊ बाद १५६ धावा करु शकला. भारतानं प्रथमच पूर्ण मालिका जिंकली आहे. सामन्यात तीन बळी घेणारा जसप्रित बुमराह सामनावीर पुरस्काराचा, तर के. एल. राहुल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचनं डॉमिनिक थिएम याचा सहा - चार, चार - सहा, दोन - सहा, सहा - तीन, सहा - चार असा विजय मिळवला.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड इथं काल १४ वं राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य
संमेलन झालं. संमेलनाच्या अध्यक्षपदी ललीता गादगे
या होत्या. यावेळी पत्रकार गंगाधर डांगे
यांना लोकसंवाद पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संगणकशास्त्र
विभागाच्या वतीनं आयोजित 'ब्लॉकचेन
टेक्नॉलॉजी' या विषयावर दोन
आठवड्यांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं आज उद्घाटन होणार आहे. देशभरातून ३० जण या
कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
****
औरंगाबादमधले प्रसिध्द युनानी तज्ञ डॉक्टर. शब्बरभाई दवासाज यांचा दफनविधी
काल बोहरा कब्रस्तान इथं करण्यात आला. दवासाज यांचं परवा रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्यानं निधन झालं होतं.
****
No comments:
Post a Comment