Friday, 14 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 14.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 14 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद  
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
चीनच्या वुहान शहरातून भारतात परत आणलेल्या सहाशे पंचेचाळीस जणांना कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला नाही असं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. कोरोना विषाणू संसर्ग अर्थात `कोविड - २०१९` या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधल्या तीन रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. `कोविड २०१९` या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनला मदत म्हणून भारतातून काही अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य पाठवलं जाणार असल्याचंही आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.
****
स्वयंपाकाच्या गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या दरानुसार ठरतात, आणि नुकतीच त्यात झालेली वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे झाली आहे, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच एकशे चव्वेचाळीस रुपये पन्नास पैसे वाढ झाली आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारनं वाढ केली असल्यानं ग्राहकावरचा त्याचा बोजा हलका झाला असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी कथित संबंधांप्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळला. त्यांना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी या करता चार आठवड्यांपर्यंत अटक करू नये, असे निर्देशही न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी या प्रकरणी दिले आहेत. भीमा कोरेगांव इथं एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर नवलखा, तेलतुंबडे आणि अन्य अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी कथित संबंधांप्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत.   
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फक्त झेंडा बदलला आहे, भूमिका बदलेली नाही, असं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. आपल्याला `हिंदू जननायक` संबोधलं जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्र्नाच्या उत्तरात नमुद केली. राज ठाकरे हे कालपासून तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज शाखा अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार असून औरंगाबाद महापालिका निवडणुकीनिमित्त शहराच्या अडचणी, समस्यांविषयी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
****
झाडे लावा, ती जगवा तरच भविष्य आहे, असं मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. बीड तालुक्यातल्या पालवण इथं सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचं उद्घाटन झालं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वडाच्या झाडाचं मनोगत व्यक्त करताना, शिंदे बोलत होते. विविध शाळा-महाविद्यालयांतल्या एकशे एक विद्यार्थिनींच्या हस्ते एकशे एक रोपांना पाणी देऊन, पूजन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या संमेलनात दुर्मिळ वनस्पती, गवताळ परिसंस्था, अशा विविध विषयांवर मार्गदर्शपर व्याख्यानं होत असून, आज या संमलेनाचा समारोप होणार आहे.
****
एकोणसाठाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेनं सादर केलेल्या `संगीत ताजमहाल` या नाटकाला वैयक्तिक दहा बक्षिसांसह प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.  राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नुकतेच इचलकरंजी इथं झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. मुंबईतल्या नाट्यभारती संस्थेच्या `संगीत स्वयंवर` नाटकाला दुसरा, तर रत्नागिरीतल्या आश्रय सेवा संस्थेच्या `जय जय गौरी शंकर` नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
****
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं २०१९ सालचा सर्वोत्तम खेळाडू हा पूरस्कार दिला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. बेल्जिअमचा आर्थर वॅन डोरेन हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
****
‘शुगर फ्री’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या संशयावरून नाशिक मध्ये  ‘शुगर फ्री टेबल टॉप स्वीटनर’ या नामांकित ब्रॅँडचा सुमारे दोन लाखांहून अधिक रकमेचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे.  
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...