Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02
February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०२ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण
झाली असून या रुग्णावर केरळमधल्याचं रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून, त्याची
प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात
परतला होता. दरम्यान, चीनमधील भारतीयांना घेऊन येणारं दुसरं विमान देखील नवी दिल्लीमध्ये
दाखल झालं आहे. यामध्ये तिनशे तेवीस भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सात मालदिवी नागरिक
देखील या विमानानं आले आहेत. या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे चौदा दिवस
हरियाणातल्या मानेसर इथल्या विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय
आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत कोरोना विषाणू
रोखण्याच्यादृष्टीनं केलेल्या तयारीची आढावा बैठक घेतली.
****
तरुण पिढीनं गतिहीन जीवनशैली सोडून द्यावी आणि निरोगी
राहण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू
यांनी केलं आहे. कर्नाटकातल्या हुबळी इथं बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठानं आयोजित
केलेल्या योग शिबिरात भाग घेतल्यानंतर ते आज बोलत होते. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश
तेंव्हाच कळू शकतो जेव्हा युवा सर्वांगीण दृष्ट्या निरोगी असतात, असंही ते यावेळी म्हणाले.
योग हा देशाचा सर्वात मोठा वारसा आहे आणि जगाला दिलेली सर्वात गौरवशाली भेट असल्याचं
त्यांनी यावेळी नमुद केलं. रामदेव आणि पतंजली योगपीठ, योग प्रशिक्षक आणि गुरु, हे योग
आणि ध्यान लोकप्रिय करून देश निरोगी बनवण्यात मोठं योगदान देत असल्याचे गौरवोद्गार
उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले.
****
निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली
उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला
आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे. याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी
दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
****
राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची
लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. मुंबईत आयोजित महाबळेश्वर
पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते. उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला
बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न व्हायला हवेत, अशी सूचना यावेळी पर्यटनमंत्री
आदित्य ठाकरे यांनी केली.
****
आदिवासी क्षेत्रात कामं करताना शिक्षण आणि आरोग्य
या क्षेत्राकडे प्रामुख्यानं लक्ष पुरवावं आणि विविध कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून
प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी
केली आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक उपाय योजना २०२०-२१ साठी नाशिकमधे
पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या
पाचव्या टीट्वेंटी सामन्यात माऊंगनुई इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे.
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं चार - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं
सलामीवीर संजू सॅमसनला केवळ आठ धावांवर गमावलं आहे. शेवटचं वृत्त आलं तेंव्हा भारताच्या
चार षटकांत एक बाद चौतीस धावा झाल्या आहेत.
****
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर सुरू असलेली खाणीची
कामं, त्यासाठी करण्यात येणारे स्फोट यामुळे परिसरातील आदिवासी वाडीवरील घरांना तडे
जात आहेत याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी खालापूर तालुक्यातील माडप येथील प्रशांत
पाटील यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाच्या
आठव्या दिवशी प्रकृती खालावल्यामुळे काल त्यांना अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यातील सोनखेड इथं
`मायनॉरीटी डॉक्टर्स असोशिएशन` आणि ग्राम पंचायत सोनखेड यांच्या संयुक्त विद्यमानं
सर्व रोगनिदान शिबीर आज आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीराचं उद्धाटन स्थानीक आमदार
मोहन हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment