Tuesday, 4 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 04.02.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 04 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांनी राज्यसभेत केली आहे. आज राज्यसभेत शून्य प्रहरात डॉ जाधव यांनी या मुद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी, भाषा प्राचीन असावी, भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्ष असावं, भाषा स्वयंभू असावी आदी निकष मराठी भाषा पूर्ण करते. मराठी भाषेतला पहिला शिलालेख अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहातही मराठी भाषा आपलं अस्तित्व टिकवून आहे. मराठी साहित्याला श्रेष्ठ साहित्य परंपरा आहे. जागतिक समाजजीवनाच्या पटलावर मराठी भाषा आपलं वेगळेपण टिकवून आहे, म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, असं डॉ जाधव यावेळी म्हणाले.

परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारनं अनेक ठोस उपाय केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे, ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते. गेल्या पाच वर्षांत २८४ मिलियन डॉलर एवढी गुंतवणूक झाली असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. खासदार नारायण राणे यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता

दरम्यान राज्यसभेत आज सकाळी कामकाज सुरू झाल्यापासूनच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू केली. अनेक सदस्य हातात फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात गोळा होऊन घोषणा देत होते. सभापती व्यंकय्या नायडू यांनी या गदारोळातच शून्यप्रहर तसंच त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला. लोकसभेत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर काही वेळातच तासाभरासाठी तहकूब झालं. भाजप नेते अनंत हेगडे यांनी बंगळुरू इथं केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत, या पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदनाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करावं लागलं. कामकाज सुरू झाल्यावर, अध्यक्षांनी शून्यप्रहर पुकारताच, विरोधी सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी या गदारोळातच शून्य प्रहराचं कामकाज सुरू ठेवल्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलून मुंबई हायकोर्ट करावं, ही मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न याच अधिवेशनात मार्गी लावावा, असं राऊत यांनी नमूद केलं.
****
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेवरून विधान परिषदेत प्रतिनिधी पाठवण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजप उमेदवार सुमीत बाजोरिया यांना तब्बल ११३ मतांनी पराभूत केलं आहे. या निवडणुकीत सर्व ४८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात चतुर्वेदी यांना २९८ मतं मिळाली तर भाजपचे सुमीत बाजोरिया यांना १८५ मतं मिऴाली. सहा मतं अवैध ठरली आहे.
****
पुण्यातल्या एल्गार परिषदप्रकरणी, एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं, प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या ९ जणांसह ११ जणांविरोधात एनआयएनं, यूएपीए अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत. पुणे पोलिसांनी तपास करताना भारतीय दंडसंहितेचं, १२४- अ हे देशद्रोहासंबंधीचं कलमही लागू केलं होतं. एनआयएच्या एफआयआर मध्ये मात्र हा आरोप ठेवलेला नाही. तसंच सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातलं कलम १२१, यासंबंधीच्या कट कारस्थानाबाबतचं कलम १२१-अ, आणि गुन्हेगारी कटासंदर्भातलं कलम १२०- ब, यांचाही एनआयएच्या या एफआयआरमध्ये समावेश नाही.
****
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरऴ सरकारने राज्यात आपत्ती घोषित केली आहे. केरळमधल्या तीन जणांना या रोगाची लागण झाल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या विषाणूची लागण झालेल्या तिघांची दक्षता घेतली जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राज्यातल्या दवाखान्यांमध्ये या साठी विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचं या बाबतच्या वृतात म्हटलं आहे.
****
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याने काल नांदेड शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
****


No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...