Wednesday, 12 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 12.02.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 12 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद  
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
बँका हा आपल्या व्यवस्थेचा कणा असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज पुण्यात बोलत होते. बँकांनी राष्ट्र उभारणीच्या कामात दिलेलं योगदान मोलाचं असल्याचंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज पुण्यात आगमन झालं आहे. 
****
दिल्ली विधानसभा निवडणुकी पूर्ण बहुमतासह निवडून आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीतल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आज दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. याशिवाय, केजरीवाल आज, पक्षाच्या नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या, या महिन्यातल्या नियोजित भारत भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ट्रंप येत्या चोवीस आणि पंचवीस तारखेला भारतात येणार आहेत. ही भेट अतिशय विशेष असून, यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री दृढ होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
मागील अनेक वर्षांपासून ब्रिटीश कौन्सिल राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर काम करत असून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठीसुध्दा शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ब्रिटीश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम यांनी अन्य अधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाव यासाठी वेगवेगळया उपक्रमातून या संस्थेची मदत घेण्यात येणार असल्याचंही शिक्षण मंत्री गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांना एकत्र येऊन भाजपविरुद्ध लढावं लागतय हाच भाजपचा विजय असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदी एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही, तर ती जागतिक पातळीवर असते, असं नमुद करताना त्यांनी या संदर्भात काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला यावेळी उत्तर दिलं.
****
१९९२-९३च्या मुंबई दंगलींची चौकशी करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात संशय व्यक्त करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल महाराष्ट्र सरकारला दिले. श्रीकृष्ण आयोगानं १९९८ मध्ये आपला अहवाल दिला असूनही राज्यसरकारांनी याबाबत आतापर्यंत काहीच कारवाई केली नसल्याचं न्यायालयानं म्हटलं. राज्याच्या गृहविभागाच्या सचिवांनी कारवाईबाबतचं प्रतिज्ञापत्र चार आठवड्यात न्यायालयाला सादर करावं, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी दिला.
****
हरभरा खरेदीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून,राज्यात लवकरच हरभरा खरेदी सुरू होईल, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत सांगितलं. अमरावती जिल्ह्यात तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणा-या नांदेड जिल्ह्यात, सर्वसामान्य हळदीपेक्षा तीन महिने लवकर काढणीला येणा-या हळदीची लागवड गेल्या वर्षीच्या मे महिन्यात  करण्यात आली होती. या हळदीच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, या पिकाला बाजारात चांगला दर मिळण्याची शेतक-यांची अपेक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
‘पंतप्रधान किसान’योजनेचा लाभ मिळालेल्या, मात्र आजपर्यंत कुठल्याही वित्त संस्था किंवा बँकेकडून किसान क्रेडीट योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतक-यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी,ज्या बँकेतून ‘पीएम किसान‘चा लाभ घेतलेला आहे,तिथे किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या रानवड इथला मंडळ अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे याला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे. तक्रारदाराच्या शेताचा रस्ता खुला करून देण्याच्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...