Monday, 3 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 03.02.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०३ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार आहे. लोकसभेत खासदार प्रवेश वर्मा तर राज्यसभेत भूपेंद्र यादव हे धन्यवाद प्रस्ताव सादर करतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गेल्या शुक्रवारी राष्ट्रपतींनी दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण केलं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या उल्लेखावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी केली होती.
****
राज्यात गेल्या बारा तासात दोन मोठ्या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. जऴगाव जिल्ह्यातत चारचाकी गाडी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत दहा जण ठार झाले. यावल तालुक्यातल्या चोपडा-फैजपूर रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातले रहिवासी चारचाकी वाहनाद्वारे एका लग्न सोहळ्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दुसरा अपघात आज पहाटे सांगली जिल्ह्यात झाला. नातेवाईकाच्या अंत्यविधीकरता जाणाऱ्या प्रवाशांची जीप, झरे गावाजवळ एका विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांसह पाच जण जागीच ठार झाले. एक जण अपघातग्रस्त जीपची काच फोडून बाहेर पडल्यामुळे बचावला, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या खटाव इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद पाटील यांची काल अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करुन हत्या केली. खटाव गावापासून काही अंतरावर काल दुपारी दुचाकीवरून घराकडे परत जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित 'ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी' या विषयावर दोन आठवड्यांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं आज उद्घाटन होणार आहे. देशभरातून ३० जण या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...