Friday, 7 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 07.02.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक०७ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      नागरिकत्व सुधारणा कायदा देशहिताचाच असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा, कायद्याबाबत जनतेची दिशाभूल न करण्याचं विरोधी पक्षाला आवाहन.

·      वसंतदादा साखर संस्थेला जालना जिल्ह्यात ५१ एकर जमीन वितरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणात कोणताही बदल नाही.

आणि

·      नकाशाकार पंडितराव देशपांडे यांना यंदाचा गोविंद सन्मान जाहीर.

****

नागरिकत्व सुधारणा कायदा देशहिताचाच असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याबाबत जनतेची दिशाभूल न करण्याचं विरोधी पक्षांना आवाहन केलं आहे. लोकसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधी पक्ष चुकीच्या मार्गावर जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं, काँग्रेससह विरोधकांचा आंदोलनाला असलेला पाठिंबा, काश्मीरमधला फुटीरतावाद अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. मुद्रा योजना, स्टार्ट अप, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, वस्तू आणि सेवा कर, स्वच्छ भारत मिशन यासारख्या सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.



राज्यसभेतही या चर्चेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआरचा काँग्रेसकडून सध्या विरोध केला जात आहे, मात्र संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात एनपीआरचं काम सुरू झालं होतं, याकडे लक्ष वेधलं. २०१४ मध्ये आपल्या पक्षाचं सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच, कोट्यवधी नागरिकांची माहिती छायाचित्रासह अद्ययावत करण्यात आली होती, याच माहितीचा सकारात्मक वापर करून, थेट लाभ हस्तांतरणासारख्या योजना आपल्या सरकारनं राबवल्याचं ते म्हणाले.



राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, नागरिकत्व सुधारणा कायद्यात श्रीलंका, नेपाळ आणि भूतान मधल्या नागरिकांचा समावेश नसल्याबद्दल, नाराजी व्यक्त करत, या प्रस्तावावरच्या मतदानापूर्वी सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला.



दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी केलेल्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव काल दोन्ही सदनांनी आवाजी मतदानानं मंजूर केला.



काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या भाषणावर सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना टीका केली आहे. इतर अनेक मुद्यांवर बोलणारे पंतप्रधान, बेरोजगारीच्या मुद्यावर काहीही बोलत नाहीत, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं.

****

राज्यातल्या पाणथळ जागांबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर केल्यासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अपर सचिवांविरोधात कारवाई का करु नये, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं काल दिले. राज्यभरात पाणथळ जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले.

****

सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली. काल मुंबईत वीज ग्राहक संघटनेसोबत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. वीजदरांसंदर्भात राज्य वीज नियामक आयोग -एम ई आर सीकडे प्रस्ताव आला असून, त्यासाठी जनसुनावणी घेण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

****

उच्च शिक्षणानं नवी पिढी सुसंस्कृत आणि संस्कारक्षम होत असताना, या पिढीनं माता, मातृभाषा, भारतमाता आणि निसर्गमातांचं संरक्षण करावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठाच्या ५६ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते. उच्च शिक्षणात आता विद्यापीठ अनुदान आयोग कुलगुरू शिक्षण प्रणाली ऐवजी, गुरूकुल शिक्षण पध्दती आणणार असल्यानं, विद्यार्थ्यांनी राजकीय कटपुतळी होवू नये, यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांनी त्यांना असामाजिक घटकापासून दूर ठेवावं, असं आवाहन पटवर्धन यांनी केलं.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल ठाणे इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण झालं. बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या जीवनप्रवासाची सर्वसमावेश माहिती या स्मारकात संग्रही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध नागरी कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.

****

चालू आर्थिक वर्षातल्या अखेरच्या दोन महिन्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या मौद्रिक धोरणात काहीही बदल केलेला नाही. बँकेचं द्वैमासिक पतधोरण काल जाहीर झालं, यात रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के तर रिव्हर्स रेपो दर चार पूर्णांक ९ दशांश टक्के कायम ठेवल्याचं, बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. पतधोरण निर्धारण करणाऱ्या समितीनं एकमतानं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

****

गुटखा व्यापाऱ्याच्या मुख्य सूत्रधाराचा तपास लावून त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा- मकोका लावण्याचा विचार राज्य सरकार गांभिर्यानं करत असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर संदेशात म्हटंल आहे. ज्या ठिकाणी गुटख्याचा साठा सापडेल किंवा गुटख्याची वाहतुक होत असलेली आढळेल, तिथल्या स्थानिक अन्न, औषध प्रशासन अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाऊन, त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

वसंतदादा साखर संस्थेला जालना जिल्ह्यात ५१ हेक्टर जमीन वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस शेती संशोधनात अग्रेसर असलेल्या या संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या ऊस शेतीविषयक संशोधनाला चालना देण्याच्या हेतूनं, हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याचं, पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. ही जमीन कोणत्याही व्यावसायिक हेतुसाठी वापरता येणार नाही, या अटीवरच वितरीत केली असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे. संस्थेचं जालना इथलं केंद्र शेतकऱ्यांना बियाणांचं वितरण करेल, तसंच ऊसाच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यासाठीही प्रयत्न करेल अशी माहितीही टोपे यांनी दिली.

****

मराठवाड्यात विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा गोविंद सन्मान यंदा नकाशाकार पंडितराव देशपांडे यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या २८ मार्च रोजी औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मालटेकडी दरम्यान, दुहेरीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी, चौदा फेब्रुवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

लातूर इथं होणाऱ्या दुसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कवी फ. म. शहाजिंदे यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन ‘विचारशलाका’ त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर नागोराव कुंभार यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्षपदी कृषी उद्योजक निलेश ठक्कर हे आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष जयद्रथ जाधव यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली. येत्या २३ फेब्रुवारीला लातूर तालुक्यातल्या मौजे एकुरगा इथं हे संमेलन होणार आहे. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागीय नेतृत्व गुण विकास शिबिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. बस स्थानकापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर मंदिर गाभारा, मंदिर परिसर, शिवाजी दरवाजा आणि पायऱ्या, स्वच्छतागृह परिसर आणि नागझरी परिसराची स्वच्छता करण्यात आली.

****

परभणी इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळा झाल्यानंतर महिला बचत गट मेळावा होणार असून, यावेळी जालना इथल्या उद्योजिका सीता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.

****

लातूर इथं काल आयकर विभागाच्या वतीनं व्यापारी, सीए, उद्योजकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. करामुळे मिळणाऱ्या महसुलातून देशाचा विकास होत असतो, त्यामुळे कर भरणं हे सर्वांचंच दायित्व असल्याचं मत, सहाय्यक आयकर आयुक्त अशोक मंगनानी यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यशाळेस व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

नांदेड जिल्ह्याच्या पाच पालिकांची पोटनिवडणुकीसाठी काल पार पडली. सहा जागांसाठी सरासरी ७० टक्के मतदान झालं. लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ साठी काल पोटनिवडणूक घेण्यात आली. अंदाजे ४९ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज मतमोजणी होणार आहे.  

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यार्थीनींसाठी मिशन साहसी शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या मिशन साहसी प्रशिक्षण शिबिरात तुळजापूर शहरातल्या दीडशे मुली सहभागी झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...