Friday, 7 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 07.02.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या दौऱ्यावर जात आहेत. कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार, आसाम सरकार आणि नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांच्यात गेल्या महिन्यात २७ तारखेला त्रिपक्षीय करार झाला. बोडो जमातीला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे.

****

निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालय आज घेणार आहे. याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा अंमलात आणायला कनिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिली होती, त्याविरोधात केंद्रसरकारनं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. त्याविरुद्ध केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणातल्या आरोपींच्या फेरविचार याचिका याआधीच फेटाळण्यात आल्या आहेत, असं केंद्र सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी काल न्यायालयाला सांगितलं.

****

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्या प्रकरणी मुंबई हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार हाफीज सईद विरोधात पाकिस्तानातलं दहशतवाद विरोधी न्यायालय आज निर्णय देणार आहे. काल न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. २००८ साली मुंबईत हल्ला करण्यासाठी सईदच्या जमात-उद-दावा या संघटनेनं लष्कर-ए- तय्यबाला मदत केल्याचा आरोप आहे.

****

काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांच्याविरोधात लोकसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजरकैदेत असलेल्या या दोन्ही नेत्यांना काल रात्री या नोंदीची प्रत देण्यात आली. उमर अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्ती हे दोन्ही नेते, गेल्या वर्षी पाच ऑगस्टला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून नजरकैदेत आहेत. अब्दुल्ला यांच्या नॅशनल कौन्फ्रन्स पक्षाचे महासचिव अली मोहम्मद सागर तसंच मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते सरताज मदनी यांच्याविरोधातही याच कायद्यान्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...