Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत
आणि श्रीलंकेमधील परस्पर सहकार्य अधिक वृद्धींगत होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी व्यक्त केला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महेंदा राजपक्षे सध्या भारत भेटीवर
असून आज दोन्ही पंतप्रधानांमध्ये नवी दिल्ली इथं द्वीपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर
मोदी वार्ताहरांशी बोलत होते. ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा उल्लेख करत श्रीलंकेचा विकास
भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलं. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण
विषयांवर चर्चा झाल्याचं सांगून ‘शेजारी प्रथम’ या धोरणाबद्दल राजपक्षे यांनी पंतप्रधान
मोदींचं यावेळी आभार मानलं.
****
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चव्वेचाळीस पुर्णांक बावन्न टक्के मतदान झालं आहे. मतमोजणी
येत्या मंगळवारी होणार आहे.
****
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा
एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. सुपा इथल्या एका कंपनीत काम करणारा हा रुग्ण पंधरा
दिवसांपूर्वी चीनमधून भारतात आला होता. त्याला खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात
दाखल करण्यात आलं. त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.
****
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव
पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परतले आहेत. त्यांनी आज मुंबईत राज ठाकरे यांच्या
उपस्थितीमध्ये मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे, भाजपचे
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन आणि भाजपचे दिलीप बनकर यांनीही आज
मनसेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुशंगानं या चौघांचा मनसे प्रवेश
महत्वाचा असल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबाद
जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते उद्या मुंबईत घुसखोरांविरुद्ध होणाऱ्या मोर्चासाठी रवाना
झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात
पिंपळगाव कोलते - तळेगाव परिसरात लांडग्याच्या हल्ल्यात एक शेतकरी आणि शेतमजूर गंभीर
जखमी झाले आहेत. शेतातील गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लांडग्यानं आधी
हल्ला केला आणि नंतर मनोऱ्याचं काम करणाऱ्या बिहारी मजुरांवर हल्ला केला. दोन्ही जखमींना
उपाचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या जालना आणि बदनापूर
तालुक्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाचं ३५ टक्के काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात
४२ किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गावर १३१० कोटी ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
असून, आजपर्यंत ४३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे
उपअभियंता दिवाकर मोरे यांनी दिली आहे. महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांसह
कालवायुक्त पुलांचं कामही प्रगतीपथावर असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
****
कांदा निर्यातीवर असलेली बंदी शासनानं
उठवावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं शेतकऱ्यांनी आज काही काळ कांदा
लिलाव बंद ठेवला. बाजार समिती परिसरात यावेळी निर्यात बंदीविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.
बाजार समितीचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवून
निर्यात बंदी हटवण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या
पावसामुळे तसंच अलीकडे पडत असलेल्या थंडीमुळे द्राक्ष पिकांचं चाळीस टक्के नुकसान झाल्याची
माहिती, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली आहे. जिल्ह्यात
ज्या द्राक्ष बागेत सहा ते दहा टनांपर्यंत उत्पादन मिळतं तिथं आज केवळ दोन ते तीन टन
उत्पन्न मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी
पाऊस झाला. या पावसामुळे अनेक धान खरेदी केंद्रांवर ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाची
नासाडी झाली आहे. तसंच रबी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय
क्रिकेट सामन्यात आज ऑकलंड इथं भारताला बावीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं
केलेल्या आठ बाद २७३ धावांच्या उत्तरात भारतीय संघ पन्नास षटकांपैकी नऊ चेंडू शिल्लक
असताना २५१ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडनं या विजयामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेत
दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवनं
आणि उद्यानं विभागाच्या दोन दिवसीय वार्षिक पुष्प प्रदर्शनाला आज औरंगाबाद इथं सुरूवात
झाली. जुने उच्च न्यायालय परिसरात आयोजित या पुष्प प्रदर्शनाचं उदघाटन सार्वजनिक बांधकाम
विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांच्या हस्ते झालं. चार खाजगी कंपन्यांसह साडे
सातशे पुष्प प्रेमींची फुलं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
****
No comments:
Post a Comment