Tuesday, 2 May 2017

AIR News Bulletin, Aurangabad 02.05.2017 - 01.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०१ दुपारी .००वा.

****

विद्यापीठ अनुदान आयोगानं पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची आधारपत्रं सार्वजनिक करू नयेत, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आधारपत्रावरची माहिती सार्वजनिक केल्यास, तिचा गैरवापर होण्याची भीती असल्यानं, आधार कायद्यानुसार ही माहिती सार्वजनिक करण्यास मनाई असल्याचं, सरकारनं म्हटलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं, मार्च महिन्यात सर्व विद्यापीठांना संशोधक विद्यार्थ्यांची माहिती आपापल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगितलं होतं.

****

केंद्रीय शहर विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सर्व राज्य सरकारांना कालपासून लागू झालेल्या स्थावर मालमत्ता कायद्याच्या नियमांना लवकरात लवकर अंमलात आणण्यास सांगितलं आहे. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कायदातल्या महत्वाच्या तरतुदींना शिथिल केल्याबद्दल नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेच्या कायद्याच्या काही मर्यादा आहेत, आणि त्यातल्या तरतुदींना शिथिल करता येणार नसल्याचं त्यांनी राज्य सरकारांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

देवास-अँट्रिक्स प्रकरणी भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांच्यासह तीन माजी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची अनुमती, दिल्लीच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभागाला दिली आहे. गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात विभागानं आरोपपत्र दाखल केलं होतं. या करारामुळे सरकारी तिजोरीला ५७८ कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप विभागानं ठेवला होता. आपल्या पदाचा दुरुपयोग करून वैयक्तिक लाभ इस्रोच्या अधिकाऱ्यानं घेतल्याचं या आरोपपत्रात म्हटलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी एक जून रोजी होणार आहे. 

****

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्यानं जे नवे नियम लागू करत असल्याबाबतचं २७ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढलं आहे, त्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे बीडचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. या पूर्वी १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार, शिक्षकांच्या बदल्यांबाबत पती - पत्नी एकत्रिकरण, आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदल्या, याबाबत समुपदेशन करून बदल्यांचे आदेश काढण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार तालुक्यात बदल्या केल्या जात होत्या. मात्र आता नव्या शासन परिपत्रकानुसार, समुपदेशन ऐवजी वीस पर्याय शिक्षकांना देऊन, त्याप्रमाणे बदल्या करण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे. कोठेही बदल्या करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाला ढाकणे यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलं असून, यावरील पुढील सुनावणी पाच जूनला होणार आहे.

****

राज्य शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या, वृक्ष लागवडीकरता लोकसहभागाचं आवाहन करणार्या चित्ररथाला काल चंद्रपूर इथून सुरुवात झाली. राज्याच्या वन विभागातर्फे हा चित्ररथ संपूर्ण राज्यभर भ्रमण करणार आहे. हरीत सेनेत सहभागी होण्याचं आणि वन, वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचं आवाहन या चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

****

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबवण्यात येत असून, याचा लाभ जिल्ह्यातल्या जनतेनं आवर्जून घ्यावा, असं आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीड इथं आरोग्य तपासणीच्या नोंदणी कक्षाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान बीड जिल्ह्यासह राज्यातल्या सहा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. येत्या २७ मे पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. 

****

नांदेड इथं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी इमारतीतल्या विविध शाखांची पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत इमारत उपलब्ध झाल्याबाबत आणि त्यातील सोयी-सुविधांबाबत खोतकर यांनी समाधान व्यक्त केलं.

****

विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना महावितरणनं तात्काळ वीज जोडणी द्यावी, असे निर्देश हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासन अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचं काम संबंधीत विभागानं करावं, असं ते म्हणाले.

****

मलेशियातल्या इपोह इथं सुरु असलेल्या सुलतान अजलान शहा हॉकी स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. पहिल्या फेरीत ब्रिटनबरोबर दोन दोन अशी बरोबरी केल्यानंतर, दुसऱ्या फेरीत भारतीय संघानं न्यूझीलंडचा तीन - शून्य असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीन...