आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१५ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या त्राल परिसरात काही दहशतवादी
लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात आज सुरक्षा बलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु
केली. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. आणखी
तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून, शोधमोहीम अद्याप सुरु आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल सर्व विरोधी पक्षांना काश्मीरमधली परिस्थिती
आणि चीन बरोबरचा तणाव याविषयी सविस्तर माहिती दिली. चीन आणि काश्मीरच्या मुद्यावरुन
विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असल्यामुळे संसदेच्या परवापासून सुरु होणार्या अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे
उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबई दौर्यावर येत आहेत. भाजपचे वरीष्ठ पदाधिकारी आणि मित्र
पक्षांशी ते यावेळी संवाद साधतील. परवा सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
****
देशातल्या दोन लाख ग्राम पंचायतीमध्ये डिसेंबर
२०१८ पर्यंत ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं, केंद्रीय दळणवळण
राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या अत्याधुनिक
एन जी ओ टी एन - नेक्स्ट जनरेशन ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क तंत्रज्ञानाचं काल त्यांच्या
हस्ते मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप
पिकांसाठी मदत म्हणून तत्काळ १० हजार रूपये कर्ज देण्याच्या
योजनेला राज्य शासनानं ३१
ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आज संपणार होती, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनानं घेतला
आहे.
****
तुळजापूर
मधल्या श्री तुळजा भवानी मंदिरात आजपासून दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत सशुल्क दर्शन सुरु करण्यात आलं आहे. बारा वर्षावरील व्यक्तिसाठी प्रत्येकी १००
रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याची माहिती तहसीलदार एस.व्ही.पवार यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment