आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१६ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
उद्यापासून सुरु होणाऱ्या
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी
आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सभागृहातलं कामकाज सुरळीत व्हावं, यासाठी
महाजन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीची
बैठकही आज होणार आहे. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार
जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या चार हजार ९६२ किलोमीटर
रस्त्याच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी ७०० कोटी रुपये निधीची मागणी
मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी
वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नुकतीच लातूर जिल्हा विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत
झालेल्या बैठकीतले निर्णय सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
****
कौशल्यावर
आधारित प्रशिक्षण घेवून युवा वर्गानं आयुष्य घडवण्याचं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी
शिवाजी जोंधळे यांनी केलं आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशासह, राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात
गुंतवणूक होऊन अनेक उद्योगधंदे उभारले जात असून अशा ठिकाणी कुशल मनुष्यबळाची मागणी
वाढत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यातल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आली
आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
शिवसेनेचा
समृध्दी महामार्गाला विरोध नाही, परंतू शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर
ठाम असल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते.
****
परभणी
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात, पालिकेच्या मालकीचे
गाळे आणि ओट्यांचे भाडे तसंच अनामत रक्कम या विषयी पारित केलेला ठराव महानगरपालिका
अधिनियमात बसत नसून तो महापालिकेस अहितकारक असल्याचं कारण सांगत राज्य शासनानं रद्द
केला आहे.
****
No comments:
Post a Comment