Monday, 10 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 10.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०१ दुपारी .००वा.

****

जम्मू काश्मीरमधल्या नौगाम सेक्टर इथं पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिलं असून, यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर बराच वेळ ही चकमक सुरु होती.

****

भारतीय लष्करानं भारत, चीन आणि भूतान सीमेवरच्या डोकलाम भागात तंबू ठोकायला सुरुवात केली आहे. चीननं भारतीय लष्कराला माघार घेण्याची मागणी केली आहे. या भागातून पीपल लिबरेशन आर्मीचे जवान माघार घेत नाहीत, तोपर्यंत आम्हीही माघार घेणार नाही, असं भारतानं चीनला बजावलं आहे. चीननं या भागात रस्ता बांधण्याचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या तीन आठवड्यापासून उभय देशात तणाव निर्माण झाला आहे. हा रस्ता तयार झाल्यास चीनला भारतावर मोठं लष्करी अधिक्य मिळू शकेल.

****

आसाममध्ये पूर परिस्थिती आजही कायम आहे. लखिमपूर जिल्ह्यात काल राष्ट्रीय महामार्ग १५ चा एक भाग वाहून गेला. ब्रम्हपुत्रा, जिया भरालीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर आणि भुस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये बचाव कार्यात केंद्र सरकारकडून पूर्ण मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

****

रेल्वेच्या वातानुकुलित तृतीय श्रेणीच्या डब्यांमध्ये आता दिव्यांग व्यक्तींसाटी खालचा बर्थ ठेवला जाणार आहे. त्यामुळे मेल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणं दिव्यांगांसाठी सुकर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. खालच्या बर्थचा थेट आरक्षणाचा लाभ दिव्यांग व्यक्तींना व्हावा यासाठी आरक्षण प्रणालीत आवश्यक बदल केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केवळ शयनयान श्रेणीच्या डब्यांमध्ये खालचा बर्थ दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवण्याची तरतूद आहे.

****

राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्वाकांक्षी अशा नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे केवळ वेळेची बचतच होणार नसून राज्यातल्या २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं आंतरराष्ट्रीय पुल आणि बोगदे परिषदेत बोलत होते.  समृध्दी महामार्ग आणि कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तसंच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करुन सहकार्य करावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. या परिषदेला जागतिक स्तरावरील तज्ज्ञ तसंच राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० प्रतिनिधी उपस्थित होते.

****

नागपूर अमरावती मार्गावरच्या वेणा जलाशयात आठ युवकांचा काल बुडून मृत्यू झाला. या जलाशयात एकूण ११ युवक नावेत बसून फिरण्यासाठी गेले असता, सेल्फी काढताना त्यांची नाव उलटली आणि हे अकरा जण पाण्यात बुडाले. यापैकी तीघे जण पोहता येत असल्यामुळे बचावले. मृत आठ जणांपैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून, बाकी सहा जणांचा शोध सुरु आहे.

****

शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्टीनं सक्षम होण्यासाठी रेशीम शेतीचा आधार घ्यावा असं आवाहन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं जिल्हा रेशीम कार्यालयात रेशीम संग्रहालय आणि माहितीगृहाचं उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

लातूर इथल्या वैशाली बुद्ध विहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा विषय महापालिकेच्या येणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येईल, असं लातूरचे उपमहापौर देविदास काळे यांनी म्हटलं आहे. आषाढ पौर्णिमेनिमित्त काल या बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहावी, बारावी, तसंच अभियांत्रिकी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायचा असेल तर सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोन चांगला हवा, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे लिखित "कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे" या पुस्तकाचं प्रकाशन काल अहमदनगर इथं, हजारे यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याच्या कारभाऱ्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा, यासाठी अशा पुस्तकांची गरज असल्याचं, हजारे यांनी नमूद केलं.

****

भुवनेश्वर इथं झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतानं काल शेवटच्या दिवशी पाच सुवर्ण पदकं जिंकून पदक तालिकेत प्रथमच अव्वल स्थान मिळवलं आहे. भारतानं या स्पर्धेत १२ सुवर्ण, पाच रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकं जिंकली आहेत. चीनला २० पदकांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारताच्या लक्ष्मण गोपाळ, निरज चोप्रा, स्वप्ना बर्मन आदींनी सुवर्ण पदकाची कमाई केली. यापूर्वी १९८५ मध्ये जकार्ता इथं झालेल्या या स्पर्धेत भारतानं २२ पदकं जिंकले होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...