Wednesday, 12 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 12.07.2017 0650


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

ठळक बातम्या

**  राज्य विधीमंडळाचं येत्या २४ जुलैपासून पावसाळी अधिवेशन  

** राज्य विशिष्ट अधिभार रद्द झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

** काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर

**  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभागीय पुरस्कार जाहीर;  लातूर जिल्ह्यातल्या धामणगावला पहिला पुरस्कार

** आणि

** भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची तर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान याची निवड

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २४ जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १५ दिवस कामकाज होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, राज्यातील कायदा - सुव्यवस्था, आदी मुद्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं काल मुंबईत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन विविध मुद्यांवर  चर्चा केली.  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलतांना संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरात आजपासून आंदोलन करण्यात येत असून बुलडाण्यापासून या आंदोलनास प्रारंभ होईल असं सांगितलं. 'माझी कर्जमाफी झाली नाही' या नावानं हे अभियान असणार असून कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन तहसीलदार आणि सरकारला या आंदोलनादरम्यान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला राज्य विशिष्ट अधिभार रद्द केल्यामुळे राज्यामध्ये पेट्रोल ६७ पैसे ते एक रुपया ७७ पैसे तर डिझेल एक रुपया २५ पैसे ते एक रुपया ६६ पैसे प्रतिलिटर इतके स्वस्त झाले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना दिली. जकात करापोटी हा अधिभार लावण्यात येत होता, वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यामुळे जकात रद्द झाली असल्याने हा अधिभार रद्द करण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा अधिभार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ते म्हणाले.

****

अमरनाथ यात्रेकरूंनी सुरक्षा विषय नियमांचं काटेकोर पालन करून, प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातल्या डहाणू आणि पालघर इथल्या दोन महिलांचा समावेश आहे.

या दोन्ही महिलांचे पार्थिव देह वायुदलाच्या विमानानं सुरत इथं आणि तिथून हेलिकॉप्टरनं डहाणू इथं आणण्यात आले, राज्यातले तीन यात्रेकरू या हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर जम्मू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबीयांना जम्मू काश्मीर सरकारकडून प्रत्येकी सहा लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली. केंद्र सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी सात लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली.

हल्ला झालेल्या बसचा चालक शेख सलीम यानं प्रसंगावधान दाखवत गोळीबारातून बस वेगानं बाहेर काढल्यानं, अनेक यात्रेकरूंचे प्राण बचावले, त्याच्या या साहसासाठी त्याला जम्मू काश्मीर सरकारनं तीन लाख रुपये तर अमरनाथ विश्वस्त मंडळानं दोन लाख रुपये, असं एकूण पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेकरुंचा नवा जत्था काल पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन पवित्र गुहेकडे रवाना झाला.

****

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल महात्मा गांधीं यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल नवी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आघाडीतल्या १८ पक्षांनी गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. येत्या पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.

****

आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयानं तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. पशुंचे खरेदी -विक्री व्यवहार फक्त नांगरणी तसंच दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीशी संबंधित कामांसाठीच करता येईल, असा आदेश केंद्र सरकारने मे महिन्यात जारी केला होता. या अधिसूचनेविरोधातल्या याचिकांवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अध्यादेशात बदल करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर न्यायालयानं या अधिसूचनेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.

****

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभागीय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार लातूर जिल्ह्यातल्या धामणगावनं पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी ग्रामपंचायतीनं, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या पिंपराळा ग्रामपंचायतीनं पटकावला आहे. सामाजिक एकतेसाठीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या आजियाबाद ग्रामपंचायतीनं, पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा वसंतराव नाईक पुरस्कार जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या खासगाव ग्रामपंचायतीनं तर कुटुंब कल्याणासाठीचा  आबासाहेब खेडकर पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोखरी ग्रामपंचायतीनं पटकावला आहे.

****

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेंडुलकर यांचं काल पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. तेंडुलकर यांच्या निधनानं सामाजिक विसंगतीवर रेषांच्या सहाय्यानं प्रभावी भाष्य करणारा कलावंत आपण गमावला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

****

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीनं काल ही घोषणा केली. आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत ही नियुक्ती असेल. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान याची निवड करण्यात आली असून, काही परदेश दौऱ्यांसाठी राहुल द्रविड याची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

हिंगोली, सेनगाव आणि औंढा या तीन तालुक्यांमध्ये २००८ आणि २००९ या दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्याचं उघडकीस आलं असून हा ९४ लाख रूपयांचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहेत. यामध्ये तत्कालीन सहा गटविकास अधिकारी, दोन कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सेवा पुरवठादार आणि ३३ गावांच्या ग्रामसेवकांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या मुस्तापूर इकळीमोर सज्जाचे तलाठी एसीकर यांना एक हजार रुपये लाच स्वीकारताना काल रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली.

****

लातूर इथं घंटागाडी कामगारांनी थकीत देयकासाठी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं, महापौर सुरेश पवार यांनी थकीत चार महिन्यांच्या देयकापैकी, दोन महिन्यांचं देयक अदा केल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतलं. उर्वरित दोन महिन्याचं देयक दहा दिवसांत अदा करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं आहे.

****

ध्वनिप्रदुषणाला आळा घालण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं घातलेले निर्बंध गणेशोत्सवा दरम्यान शिथील करण्यासाठी राज्य सरकारनं अध्यादेश जारी करावा, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरातल्या गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समस्या दूर करण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न केले जात असल्याचं, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या रुग्णालयासाठी सीटी स्कॅन आणि डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याविषयी शिर्डी संस्थानाशी बोलणी झाली असल्याचं, सावंत यांनी सांगितलं. रुग्णालय परिसरातल्या १४ इमारतींपैकी आठ जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडीट - संरचनात्मक लेखा परीक्षण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत, तसंच बांधकाम अंतिम टप्प्यात असलेल्या पाच इमारती लवकरच वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...