Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
इस्लामिक
स्टेट अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबु-बक्र-अल बगदादी हा काल मारला गेल्याचं
वृत्त आहे. इराकमधलं मोसूल शहर अतिरेक्यांच्या ताब्यातून मुक्त केल्याचा दावा इराकनं
केल्यानंतर दुस-या दिवशी, सीरियाच्या मानवी हक्क पाहणी समूहानं बगदादी मारला गेला असल्याचं वृत्त दिलं आहे. आयसिसच्या
प्रमुख अतिरेक्यांकडून ही माहिती मिळाली असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.
****
संयुक्त
राष्ट्रसंघाचे महासचीव अँटोनियो गुटेरस यांनी, अमरनाथ तीर्थयात्रेतल्या भाविकांवर काश्मीरमध्ये
झालेल्या अतिरेकी हल्ल्याची निंदा केली आहे. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाची नजर
असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिक मारले जाणं निंदनीय
असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे.
****
देश दहशतवादाच्या
अंतिम टप्प्यात आला असून दहशतवादाचा लवकरच अंत होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान कार्यालय
राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी आज केलं.अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज
अहीर यांनी, श्रीनगर इथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी जितेंद्रसिंह बोलत होते.समाजाच्या सगळ्या स्तरांमधून
या हल्ल्याचा निषेध होत आहे, असं अहीर यांनी यावेळी नमूद केलं.मात्र, या घटनेनंतरही
अमरनाथ यात्रा सुरूच असून, यात्रेकरूंच्या चेहे-यांवर आत्मबल दिसत आहे, असं प्रतिपादन
अहीर यांनी केलं.जम्मू काश्मीरमध्ये घडणा-या घटनांचा प्रभाव पूर्ण देशभरात जाणवतो,
असं नमूद करत या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला असल्याचं जितेंद्रसिंह यांनी
यावेळी म्हटलं.सामान्य काश्मिरी युवावर्गाची राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामावून जाण्याचीच
इच्छा असल्याचं दिसतं, असंही त्यांनी म्हटलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: काश्मीरच्या
स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं जितेंद्रसिंह यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान, जम्मूकाश्मीरच्या
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून,
या हल्ल्यात झालेल्या महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला.
****
वस्तू आणि
सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर हॉटेल व्यावसायिकांनी दरवाढ करणं योग्य नसल्याचं, या विभागानं
म्हटलं आहे. या प्रणालीत आपसमेळ योजनेनुसार कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना मूल्यवर्धित
प्रणालीनुसार पाच टक्के तर इतर व्यापाऱ्यांना पूर्वीच्या साडे तेरा टक्के कराऐवजी बारा
ते अठरा टक्के कर भरायचा असल्यानं, करवाढीचा अतिरिक्त बोजा पडत नाही, त्यामुळे हॉटेल
व्यावसायिकांना दरवाढीसाठी कोणतंही सबळ कारण नसल्याचं, संबंधित विभागानं स्पष्ट केलं
आहे. याउलट, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना नवीन कर पद्धतीत मिळणाऱ्या कर वजावटीचा लाभ
ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असा निर्देश या विभागानं दिला असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****
देशातल्या
सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांचा समूह स्थापन करण्याला नीती आयोगानं तत्वत:
मंजुरी दिली आहे.नवी दिल्लीत काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया आणि पंजाबच्या
मुख्य सचिवांची बैठक झाली. ह्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
येत्या
चोवीस तारखेपासून सुरू होणार असलेल्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तीन
आठवड्यांच्या कालावधीत चार अध्यादेश, पाच प्रस्तावित अध्यादेश,सात प्रलंबित विधेयकं
आणि तेरा नवीन विधेयकांसह अन्य काही प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील,अशी अपेक्षा
आहे. हे अधिवेशन येत्या अकरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकोणीस दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात
चार सुट्टयांचे दिवस असून एकूण कामकाजाचे पंधरा दिवस असणार आहेत.
पाच ऑगस्टला एक विशेष प्रस्ताव मांडला जाणार असून, त्याद्वारे माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी, पंडित दीनदयाळ उपाध्याय,गणपतराव पाटील, नानाजी देशमुख, शरद पवार आणि
शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचं अभिनंदन केलं जाणार आहे. विधीमंडळ
कार्यमंत्री गिरिष बापट यांनी ही माहिती दिली आहे.
****
ठाण्यामध्ये
उघडकीला आलेल्या, इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करण्याच्या प्रकाराचा
मास्टर माईंड प्रकाश नूलकर याला ठाणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये अटक केलं आहे.ठाण्यातल्या
पेट्रोलचोरीनंतर ठाणे पोलिसांकडून देशभरात
यासंदर्भात राबवल्या गेलेल्या मोहिमेमध्ये सुमारे अट्ठ्याण्णव पेट्रोलपंप सील
केले गेले आहेत. इंधन भरण्याच्या यंत्रांच्या चिपमध्ये फेरफार करून पेट्रोलच्या मापात
घोटाळा करण्याची कल्पना राबवणा-या नूलकरच्या, विवेक शेट्टे या साथीदाराला याआधीच अटक
करण्यात आलं आहे.नूलकर याला आज मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment