Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं.
लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. यात लोकसभेचे दिवंगत
खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह सहा आजी माजी सदस्यांना,
तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना
यावेळी श्रद्घांजली अर्पण करण्यात आली.
लोकसभेत फारुख अब्दुल्ला आणि पी के कुन्हालिकुट्टी या नवीन सदस्यांना शपथ देण्यात
आली.
राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आठ दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा
प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांना, तसंच दहशतवादी हल्ल्यात आणि काल झालेल्या अपघातात
ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या
पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्रती राज्यसभेनं शोक व्यक्त केला.
यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला
संपत असून, त्यांना येत्या २३ जुलैला एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार
आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांची स्वाक्षरी असलेली पुस्तिका राष्ट्रपतींना भेट दिली
जाणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज संसदेत आणि सर्व राज्य विधिमंडळात मतदान सुरु
आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार
मीरा कुमार यांच्यात ही निवडणूक होत आहे. सातशे शहॅत्तर खासदार तसंच चार हजार १२० आमदारांसह
एकूण चार हजार ८९६ मतदार या निवडणूकीत मतदान करत आहेत. संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र
मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी, तर मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार आणि काही खासदारांनी मतदान केलं. मतमोजणी २०
जुलैला होणार आहे.
दरम्यान, भारतीय
जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती
पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक
होणार आहे.
****
जम्मू काश्मीर मधल्या बालाकोट इथं पाकिस्तान कडून आज गोळीबार करण्यात आला. यात
एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जीएसटी
परिषदेची बैठक नवी दिल्ली इथं होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली
होणाऱ्या या बैठकीत जीएसटीच्या अंमलबजावणीविषयी देशभरातून मिळालेली माहिती, अडचणी आणि
परिस्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे.
****
येत्या काही वर्षात भारत कडधान्य आणि तेलबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल असा
विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली
इथं भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे दिल्या जाणार्या राष्ट्रीय स्तरावरच्या कृषी पुरस्कार
वितरण समारंभात बोलत होते. देशभरातल्या ११ संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं.
****
पाणी आणि उर्जेची बचत करुन रेल्वेला पर्यावरणपुरक बनवण्याचे प्रयत्न सुरु असून,
पुढच्या दहा वर्षात सौर ऊर्जेचा वापर वाढवून सुमारे ४१ हजार कोटी रुपयांच्या उर्जेची
बचत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. पुणे इथं महाराष्ट्र
विकास केंद्र संस्थेच्या वतीनं सरदार सरोवर निर्मला निगमचे माजी अध्यक्ष डॉ. जयनारायण
व्यास यांना प्रभू यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध गायिका बकुल पंडित यांनाही यावेळी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारानं गौरवण्यात
आलं.
****
राज्यात आज काही भागात पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु
आहे. मराठवाड्यातही आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. परभणी, लातूर,
उस्मानबाद, औरंगाबाद याठिकाणी काल तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात
३० पूर्णांक ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज आणि उद्या कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या
काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उद्या पाऊस दमदार
हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं
वर्तवला आहे.
****
येत्या २४ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर
मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची
सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करुन दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसिलदार अरुण जऱ्हाड
यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रावण महिन्यातल्या यात्रा महोत्सवाच्या
तयारीचा आढावा घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment