Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
वृक्षारोपण अभियानांतर्गत
आज औरंगाबाद इथं नगरनाका परिसरात खासदार चंद्रकांत खैरे आणि विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम
भापकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या वृक्षारोपण सप्ताहात औरंगाबाद जिल्ह्यासाठी
बारा लाख दोन हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, यापैकी, काल दिवसभरात एक लाख २५ हजार
झाडं लावण्यात आली.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे
निघालेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथांच्या पालख्यांसह बहुतांश लहान
मोठ्या दिंड्या आज पंढरपूर नजीक वाखरी इथं एकत्र येऊन, पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
आज वाखरी इथं पालख्यांचा भव्य रिंगण सोहळा होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं,
“पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी” या आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित करण्यात
आलेल्या पर्यावरण दिंडीचा उद्या पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
समारोप होणार आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीसाठी
पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असून, कालपर्यंत एक ते सव्वा लाखाहून
अधिक भाविक दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशीसाठी राज्य महामार्ग
परिवहन महामंडळ - एस टी नं तीन हजार ६८७ जादा बस सोडल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी
गट आरक्षण, आगाऊ आरक्षण तसंच प्रत्यक्ष बस स्थानकावर थेट तिकिटाची सुविधा दिली आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा
अंधारी व्याघ्र प्रकल्प कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत
तो बंद राहणार आहे. वन्यजीव प्रेमींची मागणी आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
- एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ताडोबा प्रशासनानं ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात
बंद ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. ज्या पर्यटकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे, त्यांना
तिकीटाची रक्कम परत केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
****
राज्यात मुंबई, ठाणे, पालघर,
गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. नाशिक
शहर आणि जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून, काल १४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरू आहे.
****
समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद
तालुक्यातल्या जमिनींचे दर जाहीर करण्यात आले़ असून, माळीवाडा, शरणापूर आणि अब्दीमंडी
इथल्या जमिनींसाठी हेक्टरी एक कोटी पेक्षा अधिक दर जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय
मोबदला निश्चिती समितीकडून मागील काही वर्षांच्या रेडी रेकनर दराचा अभ्यास करून, सन
२०१७-१८ च्या दरानुसार आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तसंच खाजगी वाटाघाटी द्वारे
थेट संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित होणाऱ्या मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के वाढीव
रक्कम देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे़.
****
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या
औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी काल स्वीकारला.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल महासंचालनालायच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे
यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. चिलवंत हे माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी
म्हणूनही कार्यरत आहेत.
****
एक राष्ट्र, एक कर, एकसंघ
बाजारपेठ हे वस्तू आणि सेवा कर प्रणालीचं वैशिष्ट्य असून, देशाला सशक्त करणारा एक विचार
म्हणूनही त्याकडे पहावे लागेल, असं प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं
आहे. मुंबईच्या विक्रीकर विभागाचं वस्तू आणि सेवा कर विभाग आणि विक्रीकर भवनाचं वस्तू
आणि सेवा कर भवन असं नामकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्येही
लवकरच वस्तू आणि सेवा कर - जीएसटीची अंमलबजावणी करण्यात येर्इल, असा विश्वास केंद्रीय
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होते. जीएसटी कर लागू झाला तरीही काश्मीरच्या ‘विशेष राज्याच्या दर्जा’वर परिणाम
होणार नाही, असं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. काश्मीरात ‘जीएसटी’ लागू न झाल्यास राज्यातल्या
नागरिकांना दोन-दोन वेळा कर भरावा लागेल आणि त्याचा फटका उत्पादकांना सहन करावा लागेल.
म्हणून राज्य आणि केंद्र सरकार जीएसटीचा आग्रह धरत असल्याचंही ते म्हणाले.
पेट्रोलियम पदार्थ तसंच स्थावर
मालमत्ता क्षेत्रालाही लवकरच जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, जेटली
यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. जीएसटीमुळे पेट्रोलियम
पदार्थांच्या किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लंडन इथं सुरु असलेल्या महिला
विश्वचषक स्पर्धेत आज डर्बी इथं भारत पाकिस्तान लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी
तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकले
आहेत.
****
No comments:
Post a Comment