आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१३ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
केंद्रीय सशस्त्र दल आणि
आसाम रायफल्स मध्ये काम करणार्या आरोग्य अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षांवरून
६५ वर्ष करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली
इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आरोग्य अधिकारी टिकून
राहतील तसंच राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यास
मदत होणार आहे.
****
महाराष्ट्र, पश्चीम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या तीन नव्या
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये संचालकांसाठीच्या तीन जागांना केंद्र सरकारतर्फे
मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळानं या तीन जागा निर्माण करण्यास परवानगी
दिली असून या जागा ताबडतोब भरण्यात येणार आहेत.
****
एखाद्या गुन्ह्यात शिक्षा
झालेल्या आमदार आणि खासदारांना आजीवन निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा, या मुद्द्यावर
निवडणूक आयोगानं काहीही भूमिका न घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त
केली आहे. हे संसदेचं कार्यक्षेत्र असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत
नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे.
****
तुरूंग आणि न्यायालयं यांच्यात
दूरदृष्य संवाद प्रणाली नुसती सुरू करू नका, तर गरजेनुसार ती वापरता येईल, याकडेही
लक्ष द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले आहेत. औरंगाबाद
शस्त्रास्त्र प्रकरणातला आरोपी शेख नईमनं, सुरक्षेअभावी न्यायालयात हजर न केल्याबद्दल
दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी करताना, न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या काँग्रेसच्या अभियानाला कालपासून
बुलडाणा इथं सुरूवात झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या
या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. राज्यसरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी
फसवी असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.
****
औरंगाबाद जालना रोडवर करमाड नजिक भरधाव
ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या
सुमारास हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment