Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
ठळक बातम्या
****
** अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून
१७
भाविकांचा मृत्यू, २९ जण जखमी
** राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं आज मतदान
**
संसदेच्या अधिवेशनास आजपासून प्रारंभ
** शेतकऱ्यांना
अधिक सवलतीच्या दरानं कर्ज देण्याचा राज्य सरकारचा विचार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि
** राज्यात कालही अनेक भागात पाऊस
आता सविस्तर बातम्या
****
जम्मू- श्रीनगर
राष्ट्रीय महामार्गावर रामबन इथं अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून १७ भाविकांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान,
बिहार, आसाम आणि हरियाणातल्या भाविकांचा समावेश आहे. जम्मू काश्मीर राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस काल दुपारच्या
सुमारास जम्मूहून पहलगामकडे जात असताना हा अपघात झाला. अमरनाथ देवस्थाननं मृतांच्या
कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये, तर पंतप्रधानांनी
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये
मदत जाहीर केली आहे.
****
वैष्णोदेवी मार्गावरही काल भुस्खलन होऊन नऊ भाविक जखमी
झाले, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका भाविकाचा समावेश आहे.
दरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
जखमी झालेल्या एका महिलेचा काल मृत्यू झाला. त्यामुळे या हल्ल्यात मारल्या गेलेल्या
भाविकांची संख्या आठवर पोहोचली आहे.
****
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून, मतमोजणी
२० जुलैला होणार आहे.. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी
राज्यपाल रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या
माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ
२४ जुलैला संपत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी
आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. विरोधी
आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना
उमेदवारी देण्यात आली आहे.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात
राज्यसभा आणि लोकसभेत १८ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
रद्द करण्यासंबधीचं विधेयक, तसंच भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७, भ्रष्टाचार
प्रतिबंध विधेयक २०१३ आदी विधेयकांचा समावेश आहे. हे अधिवेशन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार
आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशभरात
लागू झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत, पंतप्रधानांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी
ही सर्वांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार
यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
गो रक्षेच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांवर
राज्यसरकारांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी या बैठकीत दिले. गायींचं
संरक्षण करण्यासाठी कायदे आहेत, मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये,
असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
शेतकऱ्यांना अधिक
सवलतीच्या दरानं कर्ज देता यावं यासाठी नवीन योजना विचाराधीन
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मी मुख्यमंत्री
बोलतोय', या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सध्या शेतकऱ्यांना
एक लाखांपर्यंत शून्य टक्के दरानं तर एक लाखापासून तीन लाखांपर्यंत दोन टक्के दरानं शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात
येतं. शेतमालाला भाव मिळण्याकरता बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी बृहद योजना,
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी १५
जिल्ह्यांत चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपन्यांचं क्लस्टर, आदी बाबतही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी माहिती दिली.
****
शेतकरी
कर्जमाफी योजनेचा
लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची
यादी तयार करण्याकरता, राज्य सरकार एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी
या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे.
****
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे
राष्ट्रीय पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला
दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. वैयक्तिक
गटात परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या प्रगतीशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे
यांना ‘जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सोयाबीन, कपाशी आणि ज्वारीचं
विक्रमी उत्पादन तसंच जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी शिंदे यांना
हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र आणि ५० हजार रूपये असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
देशभरातल्या अकरा कृषी विज्ञान संस्थांना यावेळी उल्लेखनीय
योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं, यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या
गोखले शिक्षण संस्थेला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मान पत्र आणि सव्वा दोन लाख रूपये असं या
पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात कालही अनेक भागात पावसानं जोरदार
हजेरी लावली. नाशिक तसंच सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे. नांदेड इथं काल सायंकाळनंतर सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला. परभणी शहर
परिसरातही काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला, पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
हिंगोली इथं काल सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात उदगीर, देवणी
भागातही पावसानं हजेरी लावली, मात्र लातूरसह उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं मात्र पावसाच्या
तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद शहर परिसरात पहाटेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती.
नाशिक
जिल्ह्यात परवा रात्री सुरू झालेला पाऊस काल सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे गोदावरीला
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ९९ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात ४३० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा असून,
पाण्याचं प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या सुमारे २१ टक्के झालं आहे.
****
शासनाची वृक्ष लागवड मोहीम, जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांनी
मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं
आहे. काल औरंगाबाद इथं, माहेश्वरी मंडळातर्फे नगर नाका ते गोलवाडी-वाळूज रस्त्याच्या
दुतर्फा दोन हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं, त्यावेळी बागडे बोलत होते. पाणी संवर्धन
आणि स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतलं धान्य, काळ्या
बाजारात नेऊन विक्री करणाऱ्या दोघांना महसूल विभागानं अटक करून, धान्याचा मोठा साठा जप्त केला.
जिंतूर तालुक्यातल्या भांबरी इथं ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साहित्यात दोन
लाख २४ हजार रुपयांचं धान्य, बारदाना, टेम्पो असा सुमारे तीन लाख ८५ हजार रुपयांच्या
मुद्देमालाचा समावेश आहे.
****
परभणी शहरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या १४ जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत महानगरपालिकेच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई
केली.
****
नांदेड
इथून सुटणारी नांदेड - संबलपूर एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. ओडिशामध्ये सुरु
असलेल्या मुसळधार पावसामुळे संबलपूर विभागात रेल्वे मार्गाचा काही भाग वाहून गेल्यानं,
संबलपूर इथून सुटणारी संबलपूर ते नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती, परिणामी ही गाडी आज नांदेड इथून सुटणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.
****
विम्बल्डन
स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद स्विस टेनिसपटू रॉजर फेडररनं जिंकलं आहे. काल झालेल्या
अंतिम सामन्यात फेडररनं क्रोएशियाच्या मरिन सिलिचचा ६-३, ६-१, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये
पराभव केला. फेडररचं हे विम्बल्डन स्पर्धेतलं आठवं तर कारकिर्दीतलं एकोणिसावं ग्रॅण्डस्लॅम
विजेतेपद आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं एका वनरक्षकाला ५० हजार
रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहाथ अटक केली. रामेश्वर डुकरे
असं या वनरक्षकाचं नाव असून, वन अधिनियमांतर्गत कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच
मागितली होती.
****
येत्या २२ ऑगस्टला बॅंक उद्योगातल्या नऊ संघटना कामकाज बंद आंदोलन पुकारणार आहेत.
महाराष्ट्र स्टेट बॅंक कर्मचारी महासंघाचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी काल लातूर
इथं पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. एक कोटी पेक्षा अधिक थकबाकीदारांची सरकारनं यादी
घोषीत करावी, थकबाकीदाराला निवडणुक लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद करावी, बॅंकेच्या
कारभाराचं लोकशाहीकरण करावं आदी मागण्यांसाठी आपला लढा असून, त्या पूर्ण न झाल्यास,
संघर्ष तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, कर्जवसुली साठी बॅंक प्रशासनाला सहकार्यासाठी, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक
थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंक कर्मचारी निदर्शनं करणार असल्याचं तुळजापूरकर
यांनी सांगितलं. हा महिना बॅंक राष्ट्रीयकरण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. मोठ्या
उद्योजकांच्या थकबाकीमुळे निर्माण होणारं आर्थिक संकट, सामान्य ठेवीदाराच्या पैशांची
लूट, याबाबत गाव पातळी पर्यंत परिसंवाद घेऊन नागरिकांचं प्रबोधन करणार असल्याचं तुळजापूरकर
यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment