Tuesday, 1 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** िक विमा योजना आणि आयकर विवरण पत्र भरण्यास पाच ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

** अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ, मार्चपर्यंत सबसिडी संपुष्टात आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट

** जमावाकडून होणाऱ्या हिंसाचार, तसंच हत्येच्या घटनांमध्ये, दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे राज्य सरकारांना निर्देश

आणि

** भारतीय स्टेट बँकेच्या बचत खात्यावरच्या व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात

****

पिक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी राज्य सरकारनं, तर आयकर विवरण पत्र भरण्यासाठी केंद्र सरकारनं पाच ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बैठकीनंतर काल रात्री उशिरा, पिक विमा योजनेचे हप्ता भरण्यासाठी ५ तारखेपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा हप्ता भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. मात्र अनेक शेतकरी विमा भरू न शकल्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विमा हप्त्याचे अर्ज फक्त बँकेतच स्वीकारले जाणार असून, सार्वजनिक सेवा केंद्र, किंवा सेतूमध्ये ते स्वीकारले जाणार नाहीत, असं कृषीमंत्री फुंडकर यांनी सांगितलं.

दरम्यान, काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात या विषयावर जोरदार चर्चा झाली. या चर्चेला विधानसभेत उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पीक विमा योजनेकरता मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं, सांगितलं. पीक विमा योजनेसाठी हप्ता भरण्याची काल शेवटची तारीख होती, मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आलं नसल्यानं, या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षांनी लावून धरली.

कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी, यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांना जर विमा हप्ता भरता आला नाही, तर सरकारनं त्यांना विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी, पवार यांनी केली. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातल्या तांत्रिक अडचणींकडे लक्ष वेधलं.

शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रसचे सदस्य दिलीप वळसे पाटील, शेतकरी कामगार क्षाचे गणपतराव देशमुख, सुभाष साबणे आदी सदस्यांनी या मुद्यावर आपली भूमिका मांडली.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला असून, या योजनेतले काही निकष बदलण्याची मागणी केंद्र सरकारला केली जाईल, तसंच शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा पीकविमा हप्ता भरण्यासाठी रांगेत उभं असताना मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून तात्काळ पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा फुंडकर यांनी केली. 

****

विधान परिषदेतही पीक विमा योजनेच्या मुदतवाढीवरुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाडा, विदर्भात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवली नाही, तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या मुद्यावरुन सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब झालं.

पीक विमा योजनेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सदनाला सांगितलं.

****

प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची मुदतदेखील पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन विवरणपत्र दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती, मात्र मुदत वाढवून देण्याच्या मागणीमुळे, आता आयकरदात्यांना ई फायलिंगद्वारे पाच ऑगस्टपर्यंत विवरणपत्र भरता येणार आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनं आयकर विभागाकडे दाखल झाली आहेत. याचबरोबर पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्याची मुदतही ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचं, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्य माध्यमिक मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी, तसंच  इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रकाशित झालेला मजकूर, तपासून पाहावा, यासाठी अभ्यास मंडळाला आदेश देण्यात येतील, असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. सदस्य संजय दत्त, सुनील तटकरे, शरद रणपिसे, भाई जगताप, कपिल पाटील यांनी या संबंधीचा प्रस्ताव मांडला होता.

****

अनुदानित स्वयंपाकाचा गॅस -एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत याबद्दलची माहिती दिली आहे. पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत स्वयंपाकाच्या सिलिंडरवरील अनुदान संपवण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनं ही वाढ करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

****

जमावाकडून होणाऱ्या हिंसाचार,तसंच हत्येच्या घटनांमध्ये दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश, राज्य सरकारांना देण्यात आले असल्याचं, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. या घटनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काल लोकसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेला प्रारंभ करत, अशा वाढत्या घटनांकडे लक्ष वेधलं, या घटना देशाच्या अखंडता आणि एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात झालेल्या अशा घटनांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी, सामाजिक प्रसारमाध्यमांवरून खातरजमा न करता पसरवल्या जाणाऱ्या माहितीमुळे असे प्रकार होत असल्याकडे लक्ष वेधलं. तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, यांच्यासह अनेक सदस्यांनी अशा घटनांचा निषेध करत, केंद्र सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय स्टेट बँकेनं बचत खात्यावरच्या व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे. बचत खात्यावर एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आता तीन पूर्णांक पाच टक्के दरानं व्याज मिळणार आहे. मात्र एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर चार टक्के व्याजदर कायम असेल, त्यात काहीही बदल होणार नाही, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेची अंमलबजावणी करताना, कुठल्याही स्वरूपात रोख  रक्कम दिली जात नसल्याचा खुलासा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालया तर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यात काही अनधिकृत संघटना या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर रोख रक्कम देण्याचं आमिष दाखवून बेकायदेशीर अर्जांचं वाटप करत आहेत, मात्र या योजनेत अशा स्वरूपाचं कोणतही अनुदान देण्याची तरतूद नसल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या संघटनांपासून सावध राहण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यात अशा प्रकारच्या काही घटना घडल्याचं निदर्शनास आलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६२२ गावांमध्ये गेल्या दोन जुलैपासून ‘मिशन ९० दिवस’ उपक्रम राबवला जात आहे. स्वच्छता गृहं बांधणं आणि त्याचा नियमित वापर करण्यावर या उपक्रमाअंतर्गत प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये घरी शौचालय असलेल्या विद्यार्थ्यांनांच पुढच्या वर्गात प्रवेश, शौचालय असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशुंना वैद्यकीय सुविधांत प्राधान्य, खत वितरणात प्राधान्य आणि रुग्णांना औषधोपचारात प्राधान्य दिलं जातं आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर  -

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं शहरात सुरु केलेल्या अतिक्रमित धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत काल ४ पथकांनी १० धार्मिक स्थळं पाडली.  या मोहिमेत १ हजार एकशे एक धार्मिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असून सुरुवातीला रस्त्यांमध्ये अडचण ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटवण्यात येत आहे.

****

No comments: