Saturday, 15 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 15.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** देशातल्या दोन लाख ग्राम पंचायतीमध्ये डिसेंबर २०१८ पर्यंत ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट

** थकबाकीदार शेतकऱ्यांना तत्काळ १० हजार रूपये कर्ज योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

** राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस; नांदूर मधमेश्वरमधून साडे बावीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग

आणि

** लातूर पाणीपुरवठा योजनेचा नियोजनबद्ध आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

****

देशातल्या दोन लाख ग्राम पंचायतीमध्ये डिसेंबर २०१८ पर्यंत ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या अत्याधुनिक एन जी ओ टी एन - नेक्स्ट जनरेशन ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क तंत्रज्ञानाचं काल त्यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. ३३० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आणखी १०० शहरांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नेटवर्कचं आधुनिकीकरण करून, हाय स्पीट ब्रॉडबँड सेवा देत असल्याबद्दल सिन्हा यांनी बीएसएनएलची प्रशंसा केली.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत या योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी वाहिनीचं विलगीकरण झालेल्या ठिकाणी सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी मदत म्हणून तत्काळ १० हजार रूपये कर्ज देण्याच्या योजनेला राज्य शासनानं ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आज संपणार होती, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याबाबतचा एक शासननिर्णय काल जारी करण्यात आला.



दरम्यान, हे तातडीचं १० हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सर्व सहकारी तसंच राष्ट्रीयकृत बँकांना याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना २४ तासात कर्ज पुरवावं, असंही या पत्रात म्हटलं आहे.

****

शेतकरी कर्जमाफीचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला, याची माहिती दिल्याशिवाय, पावसाळी अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते काल नंदुरबार इथं, पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही मागणी लावून धरणार असल्याचं सांगतानाच पवार यांनी, शिवसेनेनं, बँकांच्या बाहेर ढोल वाजवून केलेल्या आंदोलनावर टीका केली. दरम्यान, धुळे इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातही पवार यांनी, शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करताना, शेतकऱ्यांची बांधिलकी असेल तर तातडीनं पावलं उचलायला हवीत, असं नमूद केलं.

****

शेतकरी कर्जमाफी प्रमाणे, विविध महामंडळांकडून दलित, आदिवासी, इतर मागासप्रवर्ग, भटके विमुक्तांनी घेतलेली कर्जही माफ करावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत काल सामाजिक न्याय मंत्रालयाची विविध विषयांवर बैठक झाली, त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत आठवले यांनी ही मागणी केली, ते म्हणाले....



या सर्व महामंडळांवर जवळपास ६३५ कोटी रुपये कर्ज असल्याचं आठवले यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यातल्या ३७२ मागासवर्गीय औद्योगिक संस्थांपैकी १३२ संस्थांवर लेखा समितीनं अपहाराचा ठपका ठेवला असून त्यापैकी ४० संस्थांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. उर्वरित ९२ संस्थांवर कारवाई शिथील करुन त्यांना नव्यानं संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

महिलांसाठी असलेल्या सोळाशे पेक्षा अधिक संघटनानी लोकसभा आणि राज्य विधिमंडळात महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. परवा, १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रलंबित महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार असून, त्यासाठी “आता ३३ टक्के नाही, ५० टक्के” असं घोषवाक्य तायर करण्यात आल्याचं पीटीआय च्या वृत्तात म्हटलं आहे.

$DC12EA2A-C5E9-4681-8DC8-792942A7110B$****

राज्यात काल बहुतांश भागात दिवसभर पाऊस झाला. मुंबई पुण्यासह कोकणातही अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने काल दुपारनंतर थोडी विश्रांती घेतली. काल सकाळपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, इगतपुरी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला, तर त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा इथं झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. जिल्ह्यातलं गंगापूर धरण ५० टक्के भरलं असून, दारणा धरण ७१ टक्के भरलं आहे. दारणा धरणातून सध्या १५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू असल्यानं, गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही सुमारे २२ हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी जायकवाडी धरणात आज सकाळी अकरा वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणात सध्या ३७३ दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण साठवण क्षमतेच्या १७ पूर्णांक १८ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातही काल औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. पुढच्या दोन दिवसात राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

लातूर शहराला भविष्यात रेल्वेने पाणी आणावं लागणार नाही, यादृष्टीनं पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण नियोजनबद्ध आराखडा तयार करावा,  त्याला तत्काळ मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. लातूर जिल्हा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे यावेळी उपस्थित होते. लातूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी, तसंच महापालिकेचं कामकाज डिजीटल करण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

उघड्यावर शौचापासून जनजागृतीसाठी ऑगस्ट महिन्यात नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष अभियान राबवलं जाणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या सप्ताहात संदेश फेरी, मानवी साखळी, अशा विविध कार्यक्रमातून नागरिकांना शौचालयाच्या वापरासाठी प्रेरित केलं जाणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात राज्यात २० लाख शौचालयं बांधण्यात आली, सध्या राज्यातले ११ जिल्हे उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून, मार्च २०१८ पर्यंत संपूर्ण राज्य उघड्यावर शौचापासून मुक्त होईल, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व गावांमधल्या शाळांमध्ये आज विद्यार्थी न्यायालय भरवून उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी आठ वाजता शौचालय वापराबाबत प्रबोधनासाठी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याचा आणि वापरण्याचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे.

****

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथल्या एका शेतकऱ्यानं हवामान खात्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवामान खात्यानं पावसाचा चुकी चा अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप या शेतकऱ्यानं केला आहे. हवामान खात्याने या वर्षी वेळेवर आणि भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आता पाऊस आला नसल्यानं, हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असं या फिर्यादीत म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजा भवानी मंदिरात आजपासून दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत सशुल्क दर्शन सुरु करण्यात आलं आहे. बारा वर्षावरील व्यक्तिसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याची माहिती तहसीलदार एस.व्ही.पवार यांनी दिली. दरम्यान, याआधीची अति महत्वाच्या व्यक्तिंसाठीची दर्शन प्रथा बंद करण्यात आली आहे. तुळजा भवानी देवीच्या पुजेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

****

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काल लातूर इथं शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. शहरातल्या गांधी चौकात दहशतवाद्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. 

****

नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे राज्यात मोठी गुंतवणूक होईल आणि १० लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सहकार मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले अनेक साखर कारखाने आणि सूत गिरण्या आर्थिक अडचणीत असून त्यांना या संकटातून बाहेर काढणं हे मोठं आव्हान असल्याचं देसाई यावेळी म्हणाले. राज्यातल्या ११ हजार सहकारी संस्था बंद अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी त्यांनी यावेळी दिली.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 26 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 26 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...