Monday, 3 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.07.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी मध्ये उत्पादन शुल्क आणि इतर कर समाविष्ट झाल्यानं जीएसटी हा व्हॅटपेक्षा अधिक भासत असल्याचं महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे. जीएसटीसंबंधी काही शंका असल्याच्या पार्श्वभूमीवर, अढिया यांनी जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांना तात्पुरत्या ओळख क्रमांकावर व्यापार करता येईल, असं स्पष्ट केलं आहे. ज्या व्यापारांनी अद्याप जीएसटीमध्ये नोंदणी केली नाही, ते सध्या आपला व्यवसाय सुरु ठेऊ शकतील, मात्र ३० दिवसांच्या आत त्यांना नोंदणी करावी लागेल, असं ते म्हणाले.   

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यामुळे देशाच्या मानांकनावर सकारात्मक परिणाम होईल, असं जागतिक मूल्यांक संस्था मूडीजनं म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकास दर आणि आयकर वाढण्यास मदत होणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. व्यापार करणं सोपं झाल्यामुळे भारत परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करेल, असं मत मूडीजचे उपाध्यक्ष विलियम फोस्टर यांनी व्यक्त केलं आहे.      

****

सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदरहीत करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, आजपासून अंशत: न्यायालयाचं कामकाज कागदरहीत सुरु होणार आहे. पाच अव्वल वरीष्ठ न्यायालयांमध्ये दाखल झालेली नवीन प्रकरणं डीजिटल पद्धतीनं दाखल करण्यात येणार आहेत. देशातल्या सगळ्या उच्च न्यायालयांना डीजिटल पद्धतीनं कामकाजाच्या नोंदी ठेवण्यासाठी एक विशिष्ट आयडी देण्यात आला आहे.  

****

देशातल्या एक लाख ६० हजार पुलांच्या सुरक्षा व्यवस्थेचं परीक्षण पूर्ण झालं असून, त्यातले सुमारे १४७ पूल मोडकळीस आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. मोडकळीस आलेल्या पुलांची तातडीनं दखल घेतली जाईल, असं ते म्हणाले.

****

पाकिस्तानात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्याची भारताची मागणी पाकिस्ताननं फेटाळून लावली आहे. दोन्ही देशांच्या कैद्यांना सोडण्याच्या वेळी भारतानं पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला. जाधव यांची तुलना सामान्य कैद्यांसोबत करता येणार नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

आसाममध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आजही पूर परिस्थिती कायम आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आठ जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून, तीन लाख नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. गुजरातमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नैॠत्य मोसमी पाऊस राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा काही भाग आणि संपूर्ण दिल्ली परिसरातही दाखल झाला आहे. राज्यातही पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून काल पाणी सोडण्यात आलं. यामुळे गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या नाशिक, इगतपुरी आणि निफाड गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या सकाळपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

राज्य सरकार आणि पोलिसांच्या विशेष प्रयत्नानं गेल्या १२ वर्षात ५९१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातले ५७२ नक्षलवादी एकट्या गडचिरोली जिल्ह्यातले असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. इतर नक्षलवादी गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातले आहेत. २००५ मध्ये राज्य सरकारनं आत्मसमर्पण योजना सुरु केली, त्याअंतर्गत नक्षलवाद्यांचं पुनर्वसन करण्यात येतं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नोटीस बजावली आहे. पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात उद्या चर्चेला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत खोत यांचं वर्तन संघटनेच्या हिताला हानीकारक असल्याचा आक्षेप घेत, अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यासंदर्भात चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

****

एकाच वेळी दोन महिन्यात चाळीस मेट्रिक टन सेंद्रिय खत तयार करणारा पथदर्शी प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरु करण्यात आला. या प्रकल्पाचं उदघाटन कुलगुरू डॉ के पी विश्वनाथा यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पाअंतर्गत वर्षाकाठी दोनशे चाळीस मेट्रिक टन सेंद्रिय गांडूळ खत निर्माण केलं जाणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यापासून वाशिम जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती असून, जिल्ह्यातल्या बाजारपेठेतली अनेक मोठी व्यापारी प्रतिष्ठान बंद आहेत. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचा कर कोणी भरायचा याबाबत आडत व्यापाऱ्यांमध्ये संदिग्धता असल्यानं जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातल्या २० लाख रुपयांच्या वर वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापारांना जीएसटी नंबर देण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...