Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 3 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
थेट सामान्य नागरिकांमधून सरपंचाची
निवड करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकांसाठी हा निर्णय लागू राहील.
गावचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकारही सरपंचाला देण्यात आला आहे. सरपंच पदाच्या
निवडणुकीसाठी सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. १९९५ नंतर जन्म
झालेल्या इच्छुकांना ही अट लागू असेल. त्यापूर्वी जन्म झालेल्यांना ही अट लागू राहणार
नाही.
****
राज्यात गेल्या एक जुलैपासून
जकात आणि एलबीटी हे कर रद्द झाल्यामुळे निर्माण होणारी महसुलाची हानी टाळण्यासाठी,
वाहन नोंदणी करताना एक रकमी आकारण्यात येणाऱ्या मोटार वाहन करामध्ये सर्वसाधारणपणे
दोन टक्के वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. सर्वच वाहनांसाठी उच्चतम
कर मर्यादा २० लाख रुपये इतकी ठेवण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या देशी, विदेशी, हातभट्टीच्या
दारूसारख्या अवैध धंद्यांवर ग्रामरक्षक दलाची स्थापना करून लोकसहभागातून आळा घालण्याच्या
दृष्टीनं महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं
आज मंजुरी दिली.
****
राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी
सेविका आणि मदतनीस यांचं मासिक मानधन, आजपासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या
उपस्थितीत आज मुंबईत, या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत,
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे दोन लाख कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बँक
खात्यामध्ये थेट मानधन जमा करणारा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हा देशातला पहिला
विभाग आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला
मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. यासाठी
न्यायालयानं सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली असून, हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा
मार्ग आणि जवळील परिसर अशा एकूण ९०८ चौरस मीटर जागेवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश
दिला आहे. हाजी अली ट्रस्टनं परिसरातलं अतिक्रमण हटवण्यासाठी असमर्थता व्यक्त केल्यानंतर
न्यायालयानं राज्य सरकारला याबाबतचे निर्देश दिले.
****
गर्भपातसंबंधित प्रकरणी सर्वोच्च
न्यायालयानं २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी दिली आहे. ही महिला
पश्चिम बंगालची राहणारी असून तिच्या गर्भातील बाळाला ह्रदयाचा गंभीर आजार झाला होता.
न्यायालयानं महिलेची तपासणी करण्यासाठी सात डॉक्टरांचं एक पथक गठीत केलं होतं. या डॉक्टरांच्या
पथकानं दिलेल्या अहवालाच्या आधारेच न्यायालयानं गर्भपाताची परवानगी दिली.
****
भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या
जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडीशातल्या चांदीपूर बेटावरुन यशस्वी
चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओनं विकसित केलं
आहे. या क्षेपणास्त्राची ही दुसरी यशस्वी चाचणी आहे.
****
बदल स्विकारायला तयार नसण्याची
मानसिकता टाळा असा सल्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत नव्यानं
दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतल्या २०१५ च्या तुकडीतल्या
सहाय्यक सचिवांशी आज पंतप्रधानांनी नवी दिल्ली इथं संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
नव्या भारताच्या उर्जेनं प्रशासकीय यंत्रणा भारून टाका असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल
यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री
विनोद तावडे यांनी यशवंत नाट्य मंदिर इथं तोरडमल यांच्या पार्थिवाचं अंतिम दशर्न घेऊन,
राज्य शासनाच्या वतीनं त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. तोरडमल यांचं काल मुंबईत प्रदीर्घ
आजारानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते.
****
आषाढी एकादशी उद्या साजरी होत
आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथांच्या पालख्यांसह बहुतांश लहान मोठ्या
दिंड्या आज पंढरपूर इथं पोहोचणार आहेत. यानिमित्त पंढरपूर नगरीत विठ्ठल भक्तांनी मोठी
गर्दी केली आहे. उद्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची
मुख्य शासकीय महापूजा होणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं,
“पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी” या आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित करण्यात
आलेल्या पर्यावरण दिंडीचा आज पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप होणार
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रती
पंढरपूर इथंही आषाढी एकादशिनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या
सोयीसाठी प्रशासनानं अनेक उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात आषाढी
एकादशीनिमित्त उद्या स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं
आहे.
****
No comments:
Post a Comment