Tuesday, 18 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 18 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज लोकसभेत आणि राज्यसभेत विविध मुद्यांवर विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज तहकूब झालं. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा उठवत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे कामकाज दिवस भरासाठी स्थगित झालं. त्याआधी सदनामध्ये जम्मू काश्मीर आणि अफगाणिस्तान मधला दहशतवादी हल्ला, तसंच इशान्येकडच्या राज्यात आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राज्यसभेत अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार या मुद्यावरुन गोंधळाचं वातावरण होतं. गदारोळ वाढतच गेल्यानं कामकाज दिवस भरासाठी तहकूब झालं.

****

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज राज्यसभा सदस्याचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दलितांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आपल्याला संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं काही हिंसक घटनांमध्ये दलितांचा छळ केल्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आज राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता, मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यावर बोलू दिलं नाही, असं मायावती यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यामुळे राजीनामा देणार असल्याचं त्या म्हणाल्या.   

****

जम्मू काश्मीरमधल्या गुरेझ सेक्टरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार झाला. याठिकाणी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा बलाच्या जवानांनी उधळून लावला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

****

अमरनाथ यात्रेकरुंचा एकोणीसावा जत्था आज पहाटे कडक सुरक्षा बंदोबस्तात जम्मूहून रवाना झाला. यात एकूण दोन हजार २४४ यात्रेकरु आहेत. त्यात एक हजार ५२२ पुरुष, ४६७ महिला आणि २३५ साधुंचा समावेश आहे.

****

हॉटेलचं एक दिवसाचं भाडं सात हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यावर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हॉटेलच्या स्टार रेटिंगचा जीएसटीशी काहीही संबंध नसल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. पंचतारांकीत हॉटेल्समध्ये २८ टक्के जीसटी लागतो, अशी शंका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. 

****

केरळमधल्या रामेश्वरम जवळ उभारण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन येत्या २७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय परिवहन राज्यमंत्री पॉन राधाकृष्णन यांनी आज मदुराई इथं ही माहिती दिली. 

****

भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षासाठी ही नियुक्ती असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं सांगितलं. तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची निवड करण्यात आली आहे.

****

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना एक ऑगस्ट २०१७ पासून सुधारित स्वरुपात राबवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न १५ लाखांपर्यंत आहे, अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलींचा जन्मदर वाढवणं, लिंग निवडीस प्रतिबंध करणं, मुलींचं शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते.

****

राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उद्योगांच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण दिलं जावं, तसंच प्रत्येक संस्था ही एक ते पाच उद्योगांशी जोडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न केला जावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. मुंबई इथं कौशल्य विकास आणि कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अर्थमंत्र्यांसमोर मॉडेल आय.टी.आय संदर्भात सादरीकरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. मॉडेल आय.टी.आय प्रकल्पासाठी पथदर्शी स्वरूपात लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली असल्याचं निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. या दोन जिल्ह्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला आय.एस.ओ. करण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरु करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

****

राज्यात आज मुंबई, रत्नागिरी, लातूर, बीड, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बीड जिल्ह्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून, शहरात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. समाधानकारक पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकरी सुखावला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीला पूर आला असून, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...