Wednesday, 19 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 19.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** ऊस पिकाखालचं तीन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

**  मनोधैर्य योजनेच्या निकषांमध्ये बदल, तर  ‘माझी कन्या भाग्यश्री’  या योजनेच्या व्याप्ती वाढ

**  संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्यांवर विरोधी पक्षांचा गदारोळ, दोन्ही सदनांचं कामकाज तहकू

आणि

** मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजेश्वरराव देशमुख यांचं निधन

****

राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत महत्त्वाचे अनेक निर्णय घेतले.

आगामी दोन वर्षात राज्यातल्या ऊस पिकाखालचं तीन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज दरानं प्रति हेक्टरी ८५ हजार ४०० रुपयांच्या मर्यादेत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जावर सात पूर्णांक २५ शतांश दरानं व्याज आकारलं जाईल. कर्जाचा नियमित भरणा केल्यानंतर ४ टक्के व्याज राज्य शासन, आणि सव्वा टक्का व्याज साखर कारखाने भरतील, तर दोन टक्के व्याज शेतकऱ्याला भरावं लागेल.

राज्यात टेंभू उपसा योजना, भिमा उजनी, मुळा, हतनूर, यासह आठ पथदर्शक प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातल्या बारमाही पिकांना सिंचनासाठी जून २०१८ पर्यंत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अहवालाच्या आधारे हे निर्बंध राज्यातल्या अन्य प्रकल्पांवर लावण्याचा शासनाचा विचार आहे.

जिल्हा भूविकास बँकांच्या सर्व मालमत्तांची विक्री करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.

मनोधैर्य योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे, एखाद्या घटनेत महिला किंवा बालकाला कायमचे मतिमंदत्व अथवा अपंगत्व आल्यास, सामुहिक बलात्कार प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा ॲसिड हल्यामध्ये चेहरा विद्रुप झाल्यास दहा लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी अडीच लाख रुपयांचा धनादेश तत्काळ देण्यात येईल, तर साडे सात लाख रुपये रक्कम दहा वर्षासाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ डिसेंबर २००९ पासूनच्या पात्र प्रकरणांना पूर्वलक्षी प्रभावाने ही योजना लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’  या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता, वार्षिक उत्पन्न साडे सात लाख रुपयांपर्यंत असलेल्या सर्व घटकातल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या एक ऑगस्टपासून ही योजना सुधारित स्वरुपात राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. या आधी फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या दंत तसंच दंतशास्त्र विषयाची गट-अ तसंच गट-ब संवर्गाची पदं लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून ती बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णयासही काल मंत्रीमंडळानं संमती दिली.

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण- मेस्मा या अधिनियमालाही पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मेस्माची मुदत पुढच्या महिन्यात संपणार होती. राज्याच्या फॅब धोरणांतर्गत प्रकरणनिहाय अधिकचं भांडवली अनुदान देण्याचा अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला.



राज्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्यासह सबलीकरण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी आखलेल्या पथदर्शी योजनेची चाल तसंच २०१८-१९ या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावासही यावेळी मान्यता दिली.



अनुसूचित जाती आणि नवबौद्ध तसंच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या आदिवासी क्षेत्रांतर्गत किंवा क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपये आणि तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपयाच्या मर्यादेत एकूण ९० टक्के अनुदान देण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे होणारी खरेदी केंद्र सरकारच्या  गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसपोर्टलच्या कार्यपद्धतीनुसार करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.



****

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्यांवर विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार तहकुब झालं. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे कामकाज दिवस भरासाठी स्थगित झालं.

राज्यसभेत अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार या मुद्यावरुन गोंधळाचं वातावरण होतं. राज्यसभेत गोरक्षकांच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काल राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दलितांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आपल्याला सदनात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देतांना केला आहे.

****

उपराष्ट्रपती पदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू तसंच काँग्रेस प्रणीत विरोधी आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केल्यानं नायडू यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे, तर शहरी विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

****



हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यात कालही अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून धरण ६५ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातल्या १२ प्रकल्पांपैकी निळवंडे, मुळा, आढळा या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या मुळा नदीपात्रात अकरा हजार घनफूट प्रतिसेकंद, तर प्रवरा नदीपात्रात ३०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.

जालना जिल्ह्यात अंबड परतूर सह अनेक ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. उस्मानाबाद, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

बीड जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. शहरात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. समाधानकारक पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकरी सुखावला आहे.

****

लातूर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. या पावसामुळे खरीप पिकाला जीवदान मिळाल्यानं शेतकरी सुखावला आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच मानवत तालुक्यात काल दिवसभर पावसाची भुरभुर सुरू होती. जिल्ह्यात शेतकऱ्यांना मात्र अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

****

मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजेश्वरराव देशमुख यांचं काल लातूर इथल्या रूग्णालयात काल निधन झालं.  ते ८१ वर्षांचे होते.   गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूरच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. परळीतल्या वैद्यनाथ विद्यालयात शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. वैद्यनाथ देवस्थान समितीचे संचालक, जवाहरलाल नेहरू संस्थेचे संचालक पद सांभाळण्यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग राहिला.

****

परभणी जिल्ह्यात वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. वनपाल धनंयज मुळे आणि वनमजूर अंकुश जाधव अशी या दोघांची नावं असून, जप्त केलेलं लाकूड परत करण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. जिंतूर तालक्यात येलदरी कॅम्प इथं ही कारवाई करण्यात आली.

****

विजेच्या कोणत्याही कामासाठी झिरो लाईनमन अर्थात खासगी लाईनमनचा वापर केला जाणार नाही, तसंच अशा प्रकरणात अपघात झाल्यास, त्याची जबाबादारी घेण्याबाबतच लेखी प्रतिज्ञापत्र महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता आणि लाईनमनकडून भरुन घेतलं जात आहे. महावितरण कंपनीच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली.

दरम्यान, कामाच्या ठिकाणी हजर राहत नसलेल्या ६० कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

जालना जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी जिल्ह्यात पर्यायी रस्ते विकासावर भर देण्यात येत असल्याचं राज्याचे पशुसंवर्धन, मस्त्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलं. जालना - घनसावंगी दरम्यान होणाऱ्या पर्यायी रस्त्याची पाहणी करताना ते काल बोलत होते.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...