Tuesday, 18 July 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 18.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१८ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली. दोन दहशतवादी भारतीय तर एक पाकिस्तानी असल्याचं लष्कराच्या संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं.

****

धुळे शहरातला कुख्यात गुंड गुड्या याचा आज सकाळी गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. टोळी युद्धातून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.

****

लष्कर ए तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा संशयित हस्तक सलीम खान उर्फ अबू अमर याला काल मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. सलीम खान याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

****

दहावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे. येत्या दोन ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला राज्यभरातून एक लाख १७ हजार ६८० विद्यार्थी बसणार आहेत.

****

मराठवाड्यात काल परभणी, बीड, नांदेडसह अनेक भागात पाऊस झाला. परभणी जिल्हयात जिंतूर तालुक्यात काल दिवसभर पाऊस सुरू होता, तर परभणी शहर परिसरात सायंकाळनंतर सुमारे तासभर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात काल सर्वदूर पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात दुपारच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरात मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातही काल समाधानकारक पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्यानं, शेतकरी वर्ग सुखावला आहे.

****

औरंगाबाद इथल्या दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी हरिभाऊ ढाकणे याला काल एक हजार रुपये लाच घेताना, रंगेहाथ अटक करण्यात आली. दारू विक्री प्रकरणी एका ढाबा मालकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करण्यासाठी त्यानं लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल पोलिस ठाण्यात सापळा रचून त्याला अटक केली.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...