Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी
आज आपला उमेदवारी आर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवाणी, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह काही केंद्रीय मंत्री, खसदार
यावेळी उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या आघाडीनं पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण
गांधी यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली असून, त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज
आज दाखल केला. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान, नायडू यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केल्यामुळे, केंद्रीय
वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा,
तर नरेंद्र तोमर यांच्याकडे शहरी विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचं
पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहात गोरक्षकांचा
मुद्दा गाजला. या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आधी
१२ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं, तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी
स्थगित करण्यात आलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा बलाच्या जवानांनी आज दहशतवद्यांचा
घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. राजौरी
आणि पूंछ जिल्ह्यातही पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं सिगारेट वर लागणाऱ्या कराच्या दरात वाढ
करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिगारेट वर आता २८ टक्के कर लागणार आहे. हा नवीन
दर मध्यरात्रीपासून लागू झाला.
****
चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची आणखी संधी
देणार नसल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. अशी संधी दिल्यानं काळ्या
पैशावर आळा घालण्याचा उद्देश सफल होणार नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ज्या नागरिकांना
काही अपरिहार्य कारणामुळे नोटा बदलून घेता आल्या नाहीत, त्यांना त्या बदलून द्याव्या,
असं न्यायालयानं सरकारला सांगितलं. यावर सरकारनं आपलं स्पष्टीकरण दिलं.
****
नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी
होण्याची तयारी मलेशिया सरकारनं दर्शवली असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ
शिंदे यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात शिंदे यांची मलेशियाच्या एका शिष्टमंडळानं
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृध्दी महामार्गाची यावेळी माहिती
दिली.
दरम्यान, या महामार्गाला विरोध करण्यासाठी येत्या पावसाळी
अधिवेशनानंतर मोर्चा काढण्याचा निर्णय नाशिक इथं झालेल्या समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या
बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यात नव्यानं लागू झालेल्या सामाजिक बहीष्कार प्रतिबंध
कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुणे इथं दाखल झाला आहे. अशी कारवाई करणारं महाराष्ट्र
हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. पुण्यातल्या तेलगु परिट समाजातल्या एका कुटुंबातल्या
मुलानं जातीबाहरेच्या मुलीशी विवाह केल्यानं त्यांच्यावर जात पंचायतीने बहीष्कार टाकला
होता. त्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी सतरा जणांविरुद्ध गुन्हा
दाखल केला आहे.
****
नाशवंत शेतीमालाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य
बाजारभाव मिळावा, तसंच काढणीनंतर शेतीमालाचं होणारं नुकसान कमी व्हावं आणि विक्री व्यवस्थेमधल्या
मध्यस्थांची मोठी साखळीही कमी व्हावी, यासंदर्भात शासनाला उपाय सुचवण्यासाठी स्थापन
करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक पुणे कृषी मंडळात पार पडली. राज्यातली कृषी विद्यापीठं,
कृषी मालाचे उत्पादक संघ, शेतकरी उत्पादन कंपन्या, अन्न प्रक्रिया उद्योग आदी विविध
घटकांनी नाशवंत शेतमालाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा म्हणून
सूचना कराव्यात, असं आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी केलं आहे.
****
रायगड जिल्हयात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार
पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून, जिल्हयातल्या बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
आहे. महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी महाड बाजारात घुसलं आहे. पुढच्या ४८ तासात मुसळधार
पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
लातूर इथं आज सकाळपासून संततधार सुरु असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना इथल्या जिल्हा हिवताप कार्यालयातले अधीक्षक किरण
सिंदखेडकर याना काल चार हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. कर्मचाऱ्याची
अर्जित रजा मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment