Tuesday, 18 July 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 18.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** उाष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्षाची व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी जाहीर

** राष्ट्रपतिपदासाठी देशभरात ९९ टक्के मतदान

**  संसदेच्या पावसाळी अधिवेशनास प्रारंभ, दिवंगत सदस्यांना श्रद्घांजली वाहून पहिल्या दिवसाचं कामकाज स्थगित

** लष्कर ए तय्यबाच्या संशयित हस्तक सलीम खान उर्फ अबू अमर याला मुंबई विमानतळावर अटक

आणि

** दहीहंडी उत्सवात लहान मुलांच्या सहभागाबाबत येत्या चार ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

**

****

भारतीय जनता पक्षाकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पक्षाचे जेष्ठ नेते एम व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली, या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल सायंकाळी नायडू यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी नायडू यांच्या उमेदवारीचं स्वागत केल्याची माहिती त्यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलतांना दिली.

नायडू यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष झाले, चारवेळा राज्य सभेचे सदस्य राहीलेले नायडू आंध्र प्रदेश विधानसभेत ही निवडून गेले होते. केंद्रातल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी  ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं. याशिवाय भारतीय जनता पक्षाचं दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर नायडू यांनी रात्री केंद्रीय माहिती प्रसारण आणि नगर विकास मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नायडू हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेससह १८ विरोधी पक्षांनी महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली असून ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं असून त्यापूर्वी सनदी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होईल.

****

राष्ट्रपतिपदासाठी काल संसदेत तसंच सर्व राज्य विधिमंडळात मतदान झालं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत झाली. सातशे शहात्तर खासदार तसंच चार हजारावर आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. देशभरात या निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदान झालं.

मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोनशे सत्त्याऐंशी आमदार आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मतदान केलं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर परदेशात असल्यामुळे मतदानाला उपस्थित नव्हते.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ तसंच अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयानं मतदानाची परवानगी दिल्यामुळे त्यांनी तुरुंगातून विधानभभवनात येऊन मतदान केलं.   

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटल्याचा आरोप फेटाळून लावत, सर्व आमदार आणि खासदार यांनी मीरा कुमार यांनाच मतदान केलं असल्याचं स्पष्ट केलं.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. काश्मीरमधल्या श्रीनगर इथले नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला आणि केरळच्या मल्लपुरम् इथले  मुस्लीम लीगचे खासदार पी के कुन्हालिकुट्टी यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह लोकसभेच्या सहा आजी माजी सदस्यांना, तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या यात्रेकरूंना श्रद्घांजली अर्पण करून सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आठ दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात आणि परवा झालेल्या अपघातात ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्रती राज्यसभेनं शोक व्यक्त करून, कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत असून, त्यांना येत्या रविवारी २३ जुलैला दुपारनंतर एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांच्या स्वाक्षरींची पुस्तिका राष्ट्रपतींना भेट देणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.

****

लष्कर ए तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा संशयित हस्तक सलीम खान उर्फ अबू अमर याला काल मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. सलीम खान याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तो संयुक्त अरब अमिरातीमधल्या अबूधाबी इथं अवैधपणे राहत होता, आवश्यक कागदपत्रांच्या अभावी त्याला परवा रात्री ताब्यात घेऊन मुंबईत पाठवण्यात आलं, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केली. २००८ साली उत्तरप्रदेशात रामपूर इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफच्या छावणीवर हल्ल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

****

दहावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे. येत्या दोन ऑगस्ट चालणाऱ्या या परीक्षेला राज्यभरातून एक लाख १७ हजार ६८० विद्यार्थी बसणार आहेत. दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जावू नये यासाठी ऑक्टोबर ऐवजी, जुलै-ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचं हे तिसरं वर्ष आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

दहीहंडी उत्सवात लहान मुलांच्या सहभागाबाबत राज्य सरकारनं येत्या चार ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी, दहीहंडी उत्सवात लहान मुलांचा समावेश करू नये, याबाबत याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं, साहसी खेळाचा नेमका अर्थ काय, तसंच पाच वर्षांचा मुलगा २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर चढू शकतो का, असे प्रश्न सरकारला विचारले.

दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकार जाहीर करण्याबाबत राज्य सरकार आग्रही असून तशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्यासाठी जानेवारी महिन्यात स्थापन करण्यात आलेल्या, के पी बक्षी समितीच्या  कार्यकक्षेत राज्य शासनानं काल वाढ केली. सहाव्या वेतन आयोगात त्रुटी राहिलेल्या वेतनश्रेणीचा अभ्यास करून या संबंधीची शिफारस करण्यासही समितीला सांगण्यात आलं आहे. याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला.

****

लातूर शहर अतिक्रमणमुक्त करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य दिलं जात असून, त्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं महापौर पवार यांनी सांगितलं.  

****

परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या एकाला काल अटक करण्यात आली. पालम पोलिसांनी लोहा रस्त्यावर ही कारवाई करून, सुमारे शंभर क्विंटल गहू आणि एक टॅम्पो जप्त केला.

****

आषाढी एकादशीनंतर पंढरपूर इथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड शहरात भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालखी काल जालन्याकडे मार्गस्थ झाली.

****

येत्या २४ जुलै पासून सुरु होत असलेल्या श्रावण महिन्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करुन दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसीलदार अरुण जऱ्हाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

राज्यभरात काल अनेक ठिकाणी दिवसभर पाऊस झाला. कोल्हापूर,  जिल्ह्यात पंचगंगा नदीला पूर आला असून, सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं, धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात सुमारे २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात बारा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

मराठवाड्यातही काल परभणी, बीड, नांदेडसह अनेक भागात पाऊस झाला.

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...