Monday, 10 July 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 10.07.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 10 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव यांच्या व्हिसा संदर्भात पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर न दिल्याबद्दल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांच्यावर टीका केली आहे. अवंतिका जाधव यांना व्हिसा मिळावा म्हणून विनंती करणारं वैयक्तीक पत्र अजीज यांना पाठवलं होतं, मात्र अद्याप त्यावर उत्तर न आल्यानं, अवंतिका जाधव यांना पाकिस्तान व्हिसा देण्यास विलंब करतोय असं दिसून येत असल्याचं स्वराज यांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

सर्वोच्च न्यायालयानं संयुक्त प्रवेश परिक्षा जेईईच्या माध्यमातून भारतीय तंत्रज्ञान संस्था - आय आय टी मध्ये प्रवेशाला घातलेली बंदी हटवली आहे. जे ई ई परिक्षेच्या प्रश्न पत्रिकेत काही चूका आढळल्यानं विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आल्याच्या विरोधात काही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर अंतिम आदेश येईपर्यंत आयआयटीच्या प्रवेशावर न्यायालयानं बंदी घातली होती. उच्च न्यायालयांनीही यासंदर्भातल्या याचिका दाखल करुन घेऊ नये, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. आयआयटी संस्थांनी प्रश्नपत्रिकेत यापुढे अशी कोणतीही चूक करु नये, ज्यामुळे न्यायालयीन कारवाईची गरज भासेल, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जेईई च्या निकालाच्या आधारे आता आयआयटीमध्ये समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

केंद्रीय शहर विकास, गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयांचं विलिनिकरण करण्यात आल्याचं केंद्रीय शहरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे. हे विलिनिकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान सरकार आणि जास्तीत जास्त शासन या धोरणेशी प्रेरित असल्याचं नायडू यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या विलिनिकरणामुळे गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये योग्य समन्वय राहील, असं ते म्हणाले.

****

जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर ए तय्यबाचा मारला गेलेला दहशतवादी बशीर लष्करीच्या एका सहकाऱ्याला आज अटक केली. संदीप कुमार शर्मा उर्फ आदील असं त्याचं नाव असून, तो उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरचा रहीवाशी आहे. एटीएम लुटण्यासह अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्यानं बशीरला मदत केली होती. 

****

सुक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी या क्षेत्राकडून ३५८ उत्पादनं खरेदी करण्याचा मोठा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. यासाठी नऊ हजारांहून अधिक सुक्ष्म आणि लघु उद्योजकांनी रेल्वेकडे नोंदणी केली आहे. स्वच्छतेसंबंधी साहित्य, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारी सामुग्री, रंग यासारखी ३५८ प्रकारची उत्पादनं खरेदी करण्यासाठी चार हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद रेल्वेनं केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

****

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेतर्फे राज्यभर जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आलं. या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाल्याचा आरोप करुन शिवसनेनं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्यालयासमोरही हे आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं १० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात यावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उस्मानाबाद इथंही जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं.  राज्यात इतर ठिकाणी सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, धुळे, नाशिक याठिकाणीही शिवसेनेनं हे आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली. स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नेमणूकही यावेळी करण्यात आली. त्यात भाजपचे १० तर शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे सहा सदस्य आहेत.

****

देशातल्या  एचआयव्ही - एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खाजगी हॉस्पिटलचे संस्थापक, एड्सतज्ञ डॉ. प्रदीप बळीराम उगीले यांचं आज मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ५० वर्षांचे होते. १९९३ साली लातूरच्या शासकीय रुग्णालयांत एचआयव्ही - एड्स तज्ज्ञ म्हणून रुजू होण्यापूर्वी उगीले यांनी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयांत एड्स बाधितांसाठी निर्माण करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या कक्षाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...