Tuesday, 11 July 2017

Text AIR News Bulletin,Aurangabad HLB 11.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

११ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं आज पहाटेपूर्वी पुण्यात राहत्या घरी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. कला क्षेत्रातल्या योगदानासाठी राष्ट्रीय पदकासह विविध पुरस्कारांनी तेंडुलकर यांचा गौरव करण्यात आला होता. विविध मासिकं तसंच वृत्तपत्रांतून प्रकाशित होणारे तेंडुलकर यांचे खुमासदार शैलीतले लेख, तसंच नाट्य परीक्षणं वाचकांच्या खास पसंतीस उतरत. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर १९ भाविक जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन पोलिस चौक्यांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यात पाच पहिलांसह सात जण ठार झाले. मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या दोन महिलांचा समावेश आहे.

****

अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले रत्नागिरी जिल्ह्यातले जवान राजेंद्र गुजर याच्या पार्थिव देहावर काल मंडणगड तालुक्यातल्या पालवणी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर चार दिवसांनी त्यांचा पार्थिव देह सापडला होता. 

****

नांदेड - मुंबई मार्गावर नवी रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. ही २२ डब्यांची रेल्वे सकाळी दहा वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं असून, ही रेल्वे सुरू होण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

****

केंद्र आणि राज्यांतली महाविद्यालयं, विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्राध्यापकांच्या वेतनात २२ ते २८ टक्क्यांची वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं, विद्यापीठ वेतन आयोग समितीद्वारे प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली असून अन्य भत्यांविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं, मनुष्य़बळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...