Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पाटण्यात होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या
निवासस्थानी होणार्या या बैठकीत संयुक्त जनता दल, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत
सामिल होण्याच्या निमंत्रणाचा औपचारिकरित्या स्वीकार करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर
भाजपशी हात मिळवणीस विरोध असलेल्या शरद यादव यांच्या गटाचीही वेगळी बैठक होणार आहे.
****
तामिळनाडूत ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र
कळघम - ए आय ए डी एम के पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणात अडथळा निर्माण झाला
आहे. पनीरसेल्वम यांच्या गटानं माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय
अन्वेषण विभागाकडून चौकशी आणि शशीकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या अटी ठेवल्यामुळे
हे विलिनीकरण होऊ शकलं नाही.
****
हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात
तदर्थ न्यायाधिशाच्या नेमणुकीच्या चर्चेबाबत पाकिस्तानकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं
परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी माध्यमांमधल्या
वृत्तांमध्ये पाकिस्ताननं तदर्थ न्यायाधिशांच्या नेमणुकीबाबत चर्चा सुरू केली असल्याचं
म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीला १८ मे रोजी स्थगिती
दिलेली आहे.
****
बिहारमध्ये पूर परिस्थितीत काहीही सुधारणा
झाली नाही. १९ जिल्ह्यातल्या एक कोटींहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराशी
संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६४ झाली आहे. बचाव कार्य सुरु असून,
पूरग्रस्त भागात विमानानं अन्नाची पाकिटं वितरीत करण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशातही पूर परिस्थिती कायम
असून, बचाव कार्याची गरज लक्षात घेता राज्य कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, आसाम मध्ये पूर परिस्थितीत सुधारणा
होत आहे. पुरामुळे राज्यातल्या २० जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
****
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी
येत्या सोमवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी,
तसंच २०१९ मध्ये लोकसभेच्या ३५० जागा जिंकण्यासाठीची रणनिती ठरवण्यासाठी बैठक बोलावली
आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच
उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी बाबतच्या अहवालांवर
यावेळी चर्चा करण्यात येईल.
****
स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात
४१८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातले जवळपास ६० टक्के रुग्ण हे ह्रदयविकार, अतिउच्च
रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा आजारानं ग्रस्त होते. त्यामुळे हे सर्व मृत्यू केवळ स्वाईन
फ्लूमुळे झाले असं म्हणता येणार नाही, असं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं.
ते मुंबई इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वाईल फ्लू प्रतिबंधक उपाय आणि
उपचारासाठी राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं यापूर्वीच आवश्यक ती पावलं उचलली
आहेत. राज्यात दोन हजार १९९ ठिकाणी तपासणी केंद्रं सुरु करण्यात आली असून, आतापर्यंत
१३ लाख ६२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं सावंत म्हणाले.
****
प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास
मदत मागण्यासाठी तसंच वाहतुकीसंदर्भातल्या तक्रारी करणं नागरिकांना सोईस्कर व्हावं
यासाठी परिवहन विभागातर्फे ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलं
आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असं आवाहन परिवहन आयुक्त डॉ. प्रविण
गेडाम यांनी केलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं
विद्यार्थ्यांना सर्व पुस्तकं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘इब्स्को डिस्कव्हरी सर्व्हिस’
नावाचा उपक्रम सुरु केला आहे. कुलगुरु डॉ. बी ए चोपडे यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं.
या माध्यमातून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले ४५ हजाराहून अधिक ई-नियतकालिके
आणि तीस लाखाहून अधिक ई-बुक्स तसंच विद्यापीठ ग्रंथालयात उपलब्ध असलेले तीन लाखांहून
अधिक वाचनसाहित्य एका क्लिक वर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
****
सातवं अंबाजोगाई साहित्य संमेलन उद्या
होणार आहे. कादंबरीकार मंदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
चार सत्रांमध्ये होणाऱ्या या एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, आदी
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या
वतीनं दिले जाणारे पुरस्कार यावेळी प्रदान केले जाणार आहेत.
****
सिनसिनाटी खुल्या टेनिस सपर्धेत भारतीय
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाचा महिला आणि पुरुष दुहेरी प्रकारात उपान्त्य
फेरीत पराभव झाला. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment