Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 18 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांवर मूल्यवर्धित
कर - व्हॅटचे दर कमी करण्याचं आवाहन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे. राज्यांना
लिहिलेल्या पत्रात जेटली यांनी, नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली वस्तू आणि सेवा कर लागू
झाल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांच्या मूल्यामुळे वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च वाढण्यावर
चिंता व्यक्त केली. जीएसटीपूर्वी पेट्रोलियम उत्पादनं आणि त्यांच्या सहाय्यानं बनवलेल्या
वस्तूंना व्हॅट लागत होता. आता जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर वस्तूंवर जीएसटी लागतो
आणि पेट्रोलियम उत्पादनांवर व्हॅट लागत असल्यामुळे कराच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर
जेटली यांनी राज्यांना व्हॅटचे दर कमी करण्यास सांगितलं आहे.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
- ट्रायनं संवाद खंड - कॉल ड्रॉप सह निकृष्ट दर्जाची सेवा देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांवर
आकारण्यात येणारा दंड वाढवून पाच लाख रुपये केला आहे. दूरसंचार कंपन्यांच्या कार्यालयाऐवजी
त्यांच्या टॉवरच्या माध्यमातून डाटा संकलित करुन त्याद्वारे कॉल ड्रॉपची माहिती घेण्याचा
निर्णयही ट्रायनं घेतला आहे. ट्रायच्या गुणवत्तेसंबंधी मानकांमध्ये कॉलड्रॉप, मोबाईल
टॉवरची उपलब्धता, फोन जोडण्यासाठी लागणारा वेळ आणि आवाजाची गुणवत्ता या बाबींचा समावेश
आहे.
****
दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांचा
मासिक बाल संगोपन भत्ता दुपटीनं वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे
अशा महिलांना आता दीड हजार रुपयांवरुन दरमहा तीन हजार रुपये बाल संगोपन भत्ता मिळणार
आहे. बालकाच्या जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत हा भत्ता दिला जाणार असल्याचं कार्मिक
आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. सुरवातीच्या दोन अपत्यांसाठीच
हा भत्ता मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२७ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार
आहेत. या श्रृंखलेचा हा ३५ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना
आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय
जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे
प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवन परिसरातल्या
त्यांच्या पुतळ्याला राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण
करुन आदरांजली वाहिली. यावेळी विधिमंडळातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
****
राज्य सरकार सर्व विभागातल्या
कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षांचं आयोजन करण्यासाठी एक पोर्टल सुरु करणार आहे. परीक्षेच्या
प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे पोर्टल सुरु करणार असल्याचं, राज्य माहिती
तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी सांगितलं. या पोर्टलवर सर्व
विभागात कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधी संपूर्ण माहिती, परीक्षा पद्धती याची सविस्तर माहिती
दिली जाणार आहे.
****
उस्मानाबाद इथं आजपासून राष्ट्रीय
जंतनाशक मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी एच. व्ही. वडगावे यांच्या हस्ते
अंगणवाडीतल्या बालकांना जंतनाशक गोळी देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. येत्या
२३ ऑगस्टलाही ही मोहीम राबवण्यात येणार असून, जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र,
ग्रामीण रुग्णालयं, जिल्हा रुग्णालयं, नागरी आरोग्य सेवा केंद्रात जंतनाशक गोळ्या उपलब्ध
करुन देण्यात आल्या आहेत.
****
राज्य शासनाचे २०१४-१५ आणि २०१५-१६चे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट
ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं
नुकतेच जाहीर केले. २०१४-१५ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय
ग्रामीण पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या धावज्याची वाडी इथल्या शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयास
जाहीर झाला, तर शहरी विभागाचे पुरस्कार परभणी इथल्या सत्यशारदा सार्वजनिक वाचनालयास,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयास जाहीर झाले
आहेत.
****
नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजवळ
चारचाकी दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. आज
सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मृत आणि जखमी सर्वजण आंध्र प्रदेशातल्या कुर्नूलचे
रहिवासी आहेत. जखमींना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment